Tuesday, April 28, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

….हा तर महाविकास आघाडीची मते फुटण्याचा संजय राऊत यांनी दिलेला इशाराच

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई :- विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणी कोणाचे नाही. हे फक्त पैशाचे काम आहे. त्यामुळे मते सांभाळा, असा संजय राऊत यांनी दिलेला सल्ला म्हणजे उद्धव ठाकरेंना यांना एकप्रकारे दिलेला इशारा आहे की विधान परिषदेला तुम्ही उभे राहिलात तर उबाठा गटाची, महाविकास आघाडीची मते फुटतील आणि तुमचा पराभव होऊ शकतो. महाविकास आघाडीत तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला असल्याने विधान परिषदेत महाविकास आघाडीत एकमत होण्याची शक्यता कमी असून उबाठा गट तसेच महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येत असल्याचा प्रहार सोमवारी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते.

संजय राऊतांनी उल्लेख केल्याप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी म्हणजे बाळंतपणाची खोली आहे का ? तुमच्या पक्षाची वांझोटी भूमिका पाहून महाराष्ट्राने तुम्हाला नाकारले. जनतेची कामे केली नसल्याने जनतेने विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्हाला भोपळाही फोडता आला नसल्याने तुम्ही जनतेच्या दृष्टीने वांझोटे झालेले आहात, अशी टीका करून बन म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही अतिशय भक्कम आणि मजबूत आहोत. महाविकास आघाडी म्हणून तुमची काय अवस्था आहे ते पहा. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडण्यासाठी काँग्रेसने अट घातली आहे की पुढील वेळेला राज्यसभेची जागा संजय राऊत यांच्याऐवजी काँग्रेसला द्या. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा सुनेत्रा पवार हे महायुती म्हणून एक आहेत. तुम्ही तुमच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची चिंता करा.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कुठेही मतदारांवर दबाव नाही. दबाव असता तर पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यात 95 टक्के मतदान झाले असते का ? ममतादीदींच्या गुंडांकडून तिथे काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या झाली. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तिथे निमलष्करी दल तैनात करावे लागल्याने इंडिया आघाडीत काय सुरू आहे ते पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते, असे बन म्हणाले.

संजय राऊत यांनी मणिपूरच्या गप्पा करू नयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह मणिपूरला गेले होते. आपल्याला चंद्रपूर सांभाळता आले नाही आणि आपण मणिपूरच्या गप्पा मारता. चंद्रपूर महापालिकेतील नगरसेवक हाताळता आले नाहीत. तिथे तुम्हाला आणि काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही. पंतप्रधान मोदी काही उद्धव ठाकरे नाहीत. महाराष्ट्रात विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे घरात बसून होते. निवडणुकीत आपण घरात बसायचे आणि कार्यकर्त्यांना सांगायचे तुम्ही लढा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांसाठी संघर्ष करणारे, कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरणारे आहेत तुमच्यासारखे घरात बसणारे नाहीत, असेही बन यांनी सुनावले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.