हंसराज,भंडारा :- खात रोड परिसरात जुन्या वादातून चौघांना मारहाण करून सोन्याचा गोफ हिसकावून नेणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोन्याचा गोफ, दुचाकी आणि रोख रकमेसह एकूण ७६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भंडारा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. १२५५/२०२६ नुसार, बीएनएस कलम ३०९(२), ३१५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये मयंक रवींद्र तिवारी (२५, मोठा बाजार), रितेश केळवदे (कस्तुरबा गांधी वॉर्ड) आणि चेतन तिघरे (सिव्हिल लाईन्स) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी विशेष पथक तयार केले होते. गुप्त माहितीच्या आधारे, २३ जून रोजी वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाजवळ संशयितरित्या फिरत असताना या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (क्रमांक MH-36/W-0424) असा एकूण ७६,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही यशस्वी कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक श्रीचंद गंगवानी, हवालदार प्रदीप डहारे, सतीश देशमुख, किशोर मेश्राम, चेतन पोटे, शुभम ठाकरे, सचिन देशमुख, आशिष तिवाडे आणि कौशिक गजभिये यांच्या पथकाने केली. आरोपींना पुढील कारवाईसाठी भंडारा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.




