– तरुणीसह चौघांना अटक; ८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन गुन्हे उघड
हंसराज प्रतिनिधी, भंडारा :- मौजा खरबी रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलांना रस्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांचे दागिने हिसकावणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. छत्तीसगडमधील रायपूरपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी एका तरुणीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे जवाहरनगर आणि कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेले तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक २७/१२/२०२५ रोजी जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा खरबी येथे ही घटना घडली होती. फिर्यादी सुमन माणिकराव पाटोळे या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरून एकट्या जात असताना, पांढऱ्या रंगाच्या हुंडाई i-20 कारमधून आलेल्या तीन तरुण आणि एका तरुणीने त्यांना रस्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. काही समजण्यापूर्वीच या टोळीने संगणमत करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावले आणि कारने पळ काढला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर्टी सेलच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे संशयास्पद पांढऱ्या रंगाची i-20 कार निष्पन्न केली. सदर कार पुन्हा जिल्ह्यात गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी साकोलीमार्गे छत्तीसगडमधील रायपूरपर्यंत या टोळीचा पाठलाग केला आणि त्यांना रायपूर हद्दीतच ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) आशिष मनोहर भट्टाचार्य (२६, रा. दुर्गापूर, रायपूर)
२) शुभम होरीलाल सोनी (२१, रा. धमतरी, छत्तीसगड)
३) सौरभ लोभनदास बंजारा (२२, रा. धमतरी, छत्तीसगड)
४) दीपिका घनश्याम गंगबेर (२३, रा. धमतरी, छत्तीसगड)
तीन गुन्हे उघड, ८.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी जवाहरनगर येथील दोन आणि कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील एक अशा एकूण तीन ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील ६४,००० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, प्रॉपर्टी सेलचे प्रभारी अधिकारी विवेक सोनवणे, पोहवा डहारे, देशमुख, मपोहवा तिवारी, पोशि पोटे, देशमुख, ठाकरे, चालक तिवाडे, गजभिये, सायबर सेलचे शैलेश बेदुरकर तसेच जवाहरनगरचे ठाणेदार भिमाजी पाटील, रमाकांत बोदरे, नितीन भालाधरे आणि राहुल तिडके यांनी पार पाडली.




