spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा पोलीस दलाचा २०२५ मध्ये ‘सुवर्णकाळ’; गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यात मोठे यश

– पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या प्रभावी रणनीतीचा ठसा; २०२४ च्या तुलनेत सर्वच आघाड्यांवर ऐतिहासिक कामगिरी

हंसराज प्रतिनिधी,भंडारा :- भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला नवी शिस्त आणि गती प्राप्त झाली आहे. सन २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये पोलीस दलाने १८ विविध आघाड्यांवर जी कामगिरी केली आहे, ती जिल्ह्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील घट असो वा १०० कोटींहून अधिकची रेती जप्ती, प्रत्येक क्षेत्रात पोलिसांनी आपली छाप सोडली आहे.

जिल्ह्यात खुनाचे प्रमाण सन २०२४ मधील १३ वरून सन २०२५ मध्ये १० वर आले आहे. खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे २० वरून १७ वर आले आहेत. तसेच, गंभीर दुखापतीच्या (कलम ३२६/११८) गुन्ह्यात ५१ वरून २२ पर्यंत मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे, अड्याळ आणि लाखांदूर येथील खुनाच्या गुन्ह्यांचा पोलिसांनी सखोल तपास करून वस्तुस्थिती समोर आणली आहे.

मालमत्ता चोरी आणि रेकॉर्डब्रेक जप्ती :

जबरी चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. सर्वात महत्त्वाची कामगिरी ‘घरफोडी’ (Burglary) गुन्ह्यांत झाली आहे. २०२४ मध्ये घरफोडीतून १२.४४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला होता, तोच आकडा २०२५ मध्ये ४८.७६ लाख रुपयांवर पोहोचला आहे. चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांतही पोलिसांनी २.३३ लाखांचा मुद्देमाल परत मिळवून दिला आहे.

गुन्हेगारांचे धाबे दणाणले: प्रतिबंधात्मक कारवाई

गुन्हेगारी प्रवृत्तीला मुळातून संपवण्यासाठी एसपी नूरुल हसन यांनी ‘हद्दपारी’ (Externment) चा प्रभावी वापर केला. २०२४ मधील १०९ कारवायांच्या तुलनेत २०२५ मध्ये १८० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले. तसेच एमपीडीए (MPDA) अंतर्गत २९ खतरनाक गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांना स्थानबद्ध केले आहे.

 अवैध धंदे आणि व्यसनाधीनतेवर प्रहार

दारूबंदी कायद्यांतर्गत २३८१ कारवाया करून ३.६५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. अंमली पदार्थांच्या (Narcotics) विरोधात ५३ वरून ७९ गुन्हे दाखल करत ८९.८९ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. सुगंधी तंबाखू आणि गुटख्याच्या तस्करी विरोधातही ३० गुन्हे दाखल करून ४९.५९ लाखांचा माल जप्त केला, ज्यामुळे तरुण पिढीला व्यसनापासून वाचवण्यास मदत झाली.

रेती तस्करांचे कंबरडे मोडले

भंडारा पोलीस दलाची २०२५ मधील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी म्हणजे रेती चोरीवरील कारवाई होय. २०२४ मध्ये ५४.३४ कोटींची जप्ती झाली होती, तर २०२५ मध्ये तब्बल १०४ कोटी ८६ लाख ८३ हजार ३०० रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ६७६ गुन्हे दाखल करून रेती माफियांचे नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे.

जुगार आणि शस्त्र कायद्यांतर्गत कारवाई

जिल्ह्यात अवैध जुगाराचे अड्डे नष्ट करण्यासाठी ७१७ कारवाया करण्यात आल्या. तसेच विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत २५ गुन्हे दाखल करून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

प्राणी संरक्षण आणि गोवंश तस्करी रोखले 

अवैध जनावरे वाहतुकीच्या ५२ प्रकरणांत ५.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. तसेच गोमांस विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी कारवाई करत १७.६७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. २०२४ मध्ये हे प्रमाण केवळ २.७५ लाख होते, जे २०२५ मध्ये सहा पटीने वाढले आहे.

एकूणच, खुनासारख्या गुन्ह्यातील घट, रेती तस्करीतील १०० कोटींची जप्ती आणि गुन्हेगारांवरील हद्दपारीचा वरवंटा यामुळे २०२५ मध्ये भंडारा जिल्हा अधिक सुरक्षित झाला आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या नियोजनामुळे पोलीस दलात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण झाली असून, सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमालीचा वाढला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.