spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई :- आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

महाराष्ट्र लोकभवन येथे आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126 व्या बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच वेगवेगळया भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार,आदी उपस्थित होते.

राज्यपाल वर्मा म्हणाले की, अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागृती घडवून आणली. अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, सामाजिक कुरीती आणि विभाजनाविरुद्ध त्यांनी उभारलेला लढा आजही प्रेरणादायी आहे.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनजातीय विकासाविषयीच्या भूमिकेमुळे आदिवासी समाज शिक्षण, रोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या क्षेत्रात पुढे जात आहे.

शिक्षण हीच व्यक्तीला आत्मनिर्भर आणि सक्षम बनविणारी सर्वात मोठी शक्ती आहे. राज्य शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहे, भोजन व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून पालकांनी आपल्या मुलांना, विशेषतः मुलींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन राज्यपाल वर्मा यांनी केले.

भारतीय इतिहासातील गोंडवाना राज्य आणि गोंड शासकांच्या गौरवशाली परंपरेचे कौतुक करत राज्यपाल वर्मा म्हणाले की, आदिवासी समाजाने हा गौरव पुन्हा प्राप्त करण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. समाजाला कुपोषण, आजारपण आणि व्यसनमुक्त करण्यासाठीही व्यापक प्रयत्नांची गरज आहे.

आदिवासी कला, नृत्य आणि संगीताच्या जतनासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागाला देण्यात आल्या आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) यांनी देखील देशातील विविध आदिवासी समाजांचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि ज्ञानव्यवस्थेचे दस्तावेजीकरण करावे, असे निर्देश दिले असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

ज्येष्ठ तारपा वादक व लोककलावंत भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख करत राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. हा सन्मान आदिवासी लोककला आणि कलाकारांच्या गौरवाचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले.

बिरसा मुंडा यांचे बलिदान स्वाभिमानाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा यांच्या यांनी अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात इंग्रजी सत्तेला हादरवून सोडले. त्यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले की, इंग्रजी राजवटीत आदिवासींचे जल, जमीन आणि जंगल यांवरील हक्क हिरावले जात असताना भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली. त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या आंदोलनामुळे इंग्रजी सत्तेला मोठे आव्हान निर्माण झाले. त्यांनी केवळ सशस्त्र संघर्षच केला नाही, तर समाजजागृती करून आदिवासी समाजाला संघटित करण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील आदिवासी वीरांचा इतिहास शोधून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय इतिहासातील अनेक विस्मृतीत गेलेले आदिवासी नायक पुन्हा प्रकाशझोतात आले.

आदिवासी संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध जीवनपद्धतींपैकी एक असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या संस्कृतीत निसर्ग संवर्धन, सामाजिक समता आणि लोककेंद्रित शासनव्यवस्थेची मूल्ये आढळतात. त्यामुळे या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणे ही शासन, समाज आणि देशाची सामूहिक जबाबदारी आहे.

राज्य शासन हे आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विविध कल्याणकारी योजनांद्वारे सक्षम आदिवासी समाज घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रयत्नांमागे भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, निर्धार आणि बलिदानाची प्रेरणा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बिरसा मुंडा यांचे बलिदान प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या स्वाभिमान, हक्क आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी दिशा दिली. त्यांचे बलिदान आजही आदिवासी समाजासह संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारला. ‘अबुआ राज एटे जाना, महारानी राज टुंडू जाना’ हा त्यांचा एल्गार आदिवासी स्वातंत्र्यलढ्याचा घोष बनला. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष उभारला आणि अन्याय, शोषण व अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद केला.

बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण, सावकार व जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध लढा, तसेच धर्मांतराच्या प्रयत्नांना विरोध केला. त्याचबरोबर अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि सामाजिक वाईट प्रथांविरोधात जनजागृती करून स्वच्छता, नैतिकता आणि एकतेचा संदेश दिला, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पातील तरतूद मोठ्याप्रमाणात वाढवली असून महाराष्ट्र शासनही आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट आश्रमशाळा, उच्च शिक्षणाच्या संधी, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन, पीएच.डी. शिष्यवृत्ती तसेच परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य यांसारखे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. आदिवासी युवक-युवती शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात उद्योगविकासाला चालना देऊन रोजगारनिर्मिती करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही शासनासह समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आदिवासी समाजातील कलाकारांना व्यासपीठ – मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी जनजाती समाजातील अनेक गुणवंत व्यक्तींना आजवर योग्य संधी मिळाली नव्हती. शासनाच्या पुढाकारामुळे त्यांना आता स्वतःची कला, विचार आणि परंपरा व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे सामाजिक न्याय मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी सांगितले.

डॉ.वुईके म्हणाले की, आदिवासी जनजाती समाज हा प्रामाणिक, नम्र आणि सांस्कृतिक मूल्ये जपणारा समाज असून आदिवासी संस्कृती, परंपरा, श्रद्धास्थाने आणि लोकवारसा जिवंत राहणे अत्यंत आवश्यक आहे. समाजाची ओळख त्याच्या दैवतांशी, सांस्कृतिक परंपरांशी आणि इतिहासाशी जोडलेली असून ही परंपरा टिकवून ठेवण्यात कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांची महत्त्वाची भूमिका आहे. आदिवासी संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन झाले तरच समाजाचे अस्तित्व आणि अस्मिता टिकून राहील.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यपाल आणि इतर मान्यवरांनी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा आणि अन्य क्रांतीकारी यांना अभिवादन केले आणि त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात शिवा दिघे आणि कलाकारांनी कलेचे सादरीकरण केले आणि नाशिक जिल्ह्यातील शिक्षक देवदत्त चौधरी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रभावती नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.