नुकताच भूतान, फिलिपीन्सने मोठा भूकंप अनुभवला. या निमित्याने या नैसर्गिक आपदेविषयी अनेकांना अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. पृथ्वीच्या पोटातील हालचालींमुळे भूकवचाचा भाग अचानक थरथरणे किंवा हादरून जाणे म्हणजे भूकंप होय. भूकंप भूगर्भातील साठलेली ऊर्जा अचानक वर उत्सर्जित झाल्यामुळे घडते. यामुळे जमिनीला हादरे बसतात, भेगा पडतात आणि काही वेळा भूपृष्ठाची रचना पूर्णपणे बदलून जाते. पृथ्वीचे कवच अनेक मोठ्या ‘टेक्टोनिक प्लेट्स’ पासून बनलेले आहे. ह्या प्लेट्स सतत संथ गतीने हालचाल करत असतात. जेव्हा प्लेट्स एकमेकांवर घासतात, एकमेकांच्या खाली दबले जातात किंवा एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा त्यांच्या बाहेरील कडांवर प्रचंड ताण निर्माण होतो. ज्या ठिकाणी हा ताण मर्यादेबाहेर जातो, तिथे खडकांचे थर अचानक तुटतात. या प्रक्रियेला ‘फॉल्टिंग’ म्हणतात. ज्या बिंदूवर खडक तुटतात, त्याला ‘फोकस’ (नाभी) म्हणतात, जो जमिनीच्या आत असतो. या नाभीपासून प्रचंड ऊर्जा लहरींच्या स्वरूपात बाहेर पडते. ज्वालामुखीचा उद्रेक, खाणकाम, मोठे धरण प्रकल्प किंवा अणुचाचण्या यांमुळेही भूकंप होऊ शकतात, परंतु बहुतांश मोठे भूकंप हे टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळेच होतात.

जेव्हा या प्लेट्समधील घर्षण अचानक सुटते, तेव्हा पृथ्वी हादरते. भूकंप नाभीतून ऊर्जेच्या लहरी चोहोबाजूंना पसरतात. यात ‘प्राथमिक’, ‘दुय्यम’ आणि ‘भूपृष्ठ’ लहरींचा समावेश असतो. या लहरी जमिनीतून प्रवास करताना कंपनं निर्माण करतात. नाभीच्या बरोबर वर असलेल्या भूपृष्ठावरील बिंदूला ‘भूकंपाचे केंद्र’ अर्थात इपिसेंटर म्हणतात, जिथे सर्वाधिक तीव्रता जाणवते. भूकंपाची तीव्रता ‘रिश्टर स्केल’वर मोजली जाते, जे भूकंपाची शक्ती दर्शवते. तर भूकंपाची दाहकता ‘मर्कॅली स्केल’ वर मोजतात. हे मोजण्यासाठी ‘सिस्मोग्राफ’ म्हणजे भूकंपमापक या यंत्राचा वापर केला जातो, जे जमिनीच्या हालचालींची नोंद करते. मुळात मानवाला भूकंप टाळता येत नाही, भूकंप ही एक नैसर्गिक भूगर्भीय प्रक्रिया आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण सध्या तरी भूकंप कधी येईल याचे अचूक भाकीत करू शकत नाही किंवा तो रोखू शकत नाही, फक्त योग्य नियोजन किंवा खबरदारी घेऊन, वित्त व जीवितहानी कमी करू शकतो. जपान, नेपाळ, चिली, इंडोनेशिया, तुर्की आणि फिलिपिन्स हे देश ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ किंवा प्लेट्सच्या कडांवर असल्याने अत्यंत भूकंप प्रवण क्षेत्रात येतात. तसेच भारताचा सुमारे ५० ते ६०% भूभाग भूकंपाच्या छायेत आहे. भारतीय प्लेट उत्तरेकडे युरेशियन प्लेटला सतत धडक देत असल्याने हिमालयीन पट्टा (काश्मीर ते ईशान्य भारत) सर्वात धोकादायक ‘झोन ५’ मध्ये येतो. याशिवाय दिल्ली, गंगा-यमुनेचे मैदान आणि कच्छचा भागही संवेदनशील आहे. अगदी दक्षिण भारतातील ‘डेक्कन ट्रॅप’ मध्येही (उदा. लातूर) भूकंप होतात. जगातील काही मोठे भूकंप असे आहेत. चिली (१९६०, ९.५) प्रचंड जीवितहानी व त्सुनामी, अलास्का (१९६४, ९.२) पायाभूत सुविधा उद्ध्वस्त, सुमात्रा (२००४, ९.१) विनाशकारी त्सुनामी, २ लाखवर मृत्यू, जपान (२०११, ९.०) फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प अपघात, कामचटका (१९५२, ९.०) रशियात मोठे नुकसान इत्यादी. भारतात सुद्धा मोठे भूकंप झालेले आहेत जसे, कच्छ २००१ मध्ये २०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आणि प्रचंड वित्तहानी झाली, लातूर -किल्लारी (१९९३) दक्षिण भारतातील या भूकंपाने १०,००० बळी घेतले, काश्मीर (२००५) ७.६ रिश्टर स्केलच्या धक्क्याने मोठे नुकसान झाले होते, बिहार-नेपाळ (१९३४) उत्तर भारताला हादरवून सोडणारा मोठा भूकंप वगैरे. या आणि अशाच घटनांमुळे भारताच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणात मोठे बदल झाले. भूकंपरोधक बांधकामे करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. भारतात ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ (BIS) ने बांधकामाचे नियम ठरवले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल सज्ज असले तरी जुन्या इमारतींचे ऑडिट आणि नियमांची कडक अंमलबजावणी यामध्ये भारत अजूनही मागे आहे. भूकंप होताच घाबरून न जाता “खाली वाका, टेबलखाली आसरा घ्या आणि धरून ठेवा” या सूत्राचा वापर करायला हवा. लिफ्टचा वापर टाळला पाहिजे. इमारतीपासून दूर मोकळ्या जागेत जाणे सुरक्षित असते. सरकारने शाळा-कॉलेजात नियमित मॉक ड्रिल घेणे आणि भूकंप प्रवण भागातील लोकांनी आपत्कालीन किट तयार ठेवणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनाने आवश्यक ते प्रशिक्षण, संशोधन यावर भर दिला पाहिजे. किमान प्रत्येक तालुक्यात भूकंप मापक यंत्रे बसविणे, भूकंप प्रवण क्षेत्रात योग्य ती पूर्वतयारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनच भूकंपातील जीवितहानी टाळू शकतो.
– प्रा. विलास डोईफोडे, सावनेर







