नागपूर :- केंद्र सरकारच्या पंतप्रधान–आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन (PM-ABHIM) अंतर्गत व एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम (IDSP) यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील शहरी भागांमध्ये रोग सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठी देशभरात स्थापन करण्यात आलेल्या २० मेट्रोपॉलिटन सर्वेलन्स युनिट यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक सेन्ट्रल सर्वेलन्स युनिट (CSU) व IDSP यांच्या वतीने वर्धा रोड स्थित हॉटेल ले मेरिडियन येथे ६ व ७ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
या राष्ट्रीय बैठकीसाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त (शहर) वसुमना पंत, सौरभ जैन, सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आशिमा भटनागर, उपसचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, डॉ. रंजन दास, संचालक, एनसीडीसी डॉ. हिमांशू चौहान, अतिरिक्त संचालक, एनसीडीसी डॉ. शुभांगी कुलसंगे, संयुक्त संचालक, एनसीडीसी यांच्यासह मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, केंद्र व राज्य पातळीवरील मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहे. तसेच PATH संस्थेचे अधिकारी या बैठकीत समन्वयकाची भूमिका बजावणार आहेत.
या बैठकीत एमएसयुच्या कार्यप्रगतीचा आढावा, अंमलबजावणीतील आव्हाने, तसेच भविष्यातील कार्यक्षमतेसाठी रोडमॅप तयार करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. राज्य व विविध महत्त्वाच्या भागधारकांमध्ये समन्वय साधून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. बैठकीदरम्यान आयोजित पॅनल चर्चेसाठी एम्स नागपूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर व सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहून आपले मार्गदर्शन करणार आहेत. ही बैठक देशातील शहरी भागांमध्ये रोग सर्वेक्षण व त्वरित प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.








