– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार
वर्षभर घरात बसायचे आणि भेटी मिळत नाहीत म्हणून खासदार दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघांमध्ये दौरे करायचे याने काहीही साध्य होणार नाही. असे वरातीमागून घोडे काढून तुमची वरात सजणार नाही. संजय राऊत ज्या पद्धतीची शिवीगाळ करतात त्यामुळे जनता तुमच्या पाठीशी नाही. खासदार – आमदारांना गद्दार म्हणण्यापेक्षा हे लोक आपल्याला का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण करा. आता खासदार सोडून गेले. येत्या काळात तुमचे आमदार, नगरसेवकही आणि सामान्य कार्यकर्तेही तुमच्यासोबत राहणार नाहीत. संजय राऊत यांच्या मूर्खपणाच्या बडबडीला कंटाळून जनतेने आपल्याला नाकारलेय, हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यावे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला.
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका सुरात, एका दिलाने काम करत असल्याचे सांगून बन म्हणाले, आम्ही राष्ट्रप्रथम याच धोरणातून काम करतो. आमचा अजेंडा मातोश्री 2 बांधणे नाही. देवेंद्र फडणवीस चा अजेंडा महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा असल्यानेच त्यांना तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले. महाराष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवूनच देवेंद्र फडणवीस दिवसरात्र काम करत असतात. तुमच्यासारखे घरात बसत नाही. तुमच्यासारखी गटबाजी महायुतीत नाही. मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना महायुतीत कधीही पहायला मिळत नाही. त्यामुळे संजय राऊतांनी आधी आपल्या घरातील फाटकी धुणी धुत बसावे आणि मग इतरांवर टीका करावी.
आजवर ज्यांनी ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अपमान केला त्यांचा सत्यानाश झाला. मग काँग्रेस असेल, उबाठा गट असेल अथवा संजय राऊत, तुम्ही असाल. आज पुष्पक विमानाबद्दल अपशब्द वापरून तुम्ही प्रभू रामचंद्रांचा पुन्हा एकदा अपमान केला. राम मंदिर ट्रस्टमध्ये जो काही कथित घोटाळा झालाय त्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली. कुणालाही सोडले जाणार नाही. ज्यांनी चूक केली त्यांना शिक्षा देण्याचे काम प्रभू रामचंद्र करतीलच. परंतु देशाची घटना आणि कायद्यानुसारही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. सातत्याने हिंदू धर्माचा, प्रभू रामचंद्रांचा अपमान करायचा. हिंदूंच्या श्रद्धेवर अशा पद्धतीने आघात करणार असाल तर जनता, प्रभू रामचंद्रांचे भक्त धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दात बन यांनी फटकारले.
अमित शाह कुठला पक्ष चालवतात हे सांगण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा उबाठा गट काँग्रेसच्या जीवावर जिवंत आहे, हे पहा. तुमचे सगळे धोरण राहुल गांधींना बहाल केलेले आहे. राहुल गांधींचा, काँग्रेसचा अजेंडा रेटायचा, हाच तुमचा धंदा आहे. हिंमत असेल तर राहुल गांधींना बाजूला सारून उबाठाने आपले कार्यक्रम करावेत. काँग्रेसकडून सुपारी घेत उबाठा गट काँग्रेसमध्ये विसर्जित करायची तयारी संजय राऊत यांच्याकडून सुरू आहे. राहुल गांधींची बेनामी शाखा म्हणजे उबाठा गट आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे, असे बन यांनी सुनावले.




