गडचिरोली २२ : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोयार गावात बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. सण साजरा करण्यासाठी आश्रमशाळेतून घरी आलेल्या 5 वर्षीय रिशान प्रकाश पुंगाटी या मुलाचा गावाजवळील नाल्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे कोयार गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिशान हा लाहेरी येथील आश्रमशाळेत पहिल्या इयत्तेत शिकत होता. बैलपोळ्याचा सण साजरा करण्यासाठी त्याचे वडील प्रकाश पुंगाटी यांनी त्याला शाळेतून घरी आणले होते. घरी आल्यानंतर रिशान गावाजवळील नाल्यात अंघोळ करण्यासाठी गेला. मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेनंतर गावकऱ्यांनी रिशानचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ शोधूनही तो न सापडल्याने महसूल प्रशासन आणि गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. काही वेळानंतर रिशानचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आला.
रिशानच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कोयार गाव शोकमग्न झाले आहे.




