spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अर्जुनी-मोरगावसह गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न विधानसभेत मांडले – आमदार राजकुमार बडोले

यासीन शेख, गोंदिया अर्जुनी-मोर :- महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी राज्यातील तसेच गोंदिया जिल्हा आणि अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी बोलताना आमदार बडोले यांनी गोंदिया जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी स्टील प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यात यावे, जेणेकरून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, अशी मागणी केली. तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले.

फीडर सेपरेशनमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याची गरज व्यक्त करत राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना प्रत्यक्ष गरजू महिलांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील २०० हून अधिक दिव्यांग शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून दिव्यांग कल्याण विभागात संवेदनशील व जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

मुंबई विद्यापीठ परिसरात पाली भवन उभारणीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या भंतेजींवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवत पाली भवन तातडीने उभारण्यात यावे तसेच उर्दू अकादमीच्या धर्तीवर स्वतंत्र पाली अकादमी स्थापन करण्यात यावी, अशी मागणी आमदार बडोले यांनी केली.

भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नालासोपारा येथील प्राचीन बौद्ध स्तूपाच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेले ५ कोटी रुपये अद्याप वितरित करण्यात आले नसल्याकडे लक्ष वेधून निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. गोंदिया जिल्ह्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या प्रतापगड पर्यटन स्थळाला ‘ब’ वर्ग पर्यटन दर्जा देण्यात यावा, असेही त्यांनी सभागृहात मांडले.

यासोबतच राज्यातील बौद्ध लेण्यांच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, झाडीपट्टी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात झाडीपट्टी संमेलन आयोजित करण्यात यावे तसेच नवेगावबांध येथे झाडीपट्टी नाट्यकला अकादमी स्थापन करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणीही त्यांनी केली.

मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रासह गोंदिया जिल्ह्यातील विविध विकास, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रश्न प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.