– स्वतंत्र विदर्भासह ३ लाख नोकऱ्या आणि शेतकरी कर्जमुक्तीसाठी एल्गार
हंसराज,प्रतिनिधी भंडारा नागपूर :- विदर्भाच्या विकासातील आर्थिक असमतोल दूर करून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’ने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. येत्या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथे भव्य जनसंपर्क ‘लाँग मार्च’ आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे भंडारा-गोंदिया जिल्हा अध्यक्ष संजय केवट यांनी दिली आहे.
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नागपूर येथील शहीद चौक येथून या ऐतिहासिक लाँग मार्चला सुरुवात होईल. दुपारी २ वाजता चिटणीस पार्क येथे या मार्चचे रूपांतर एका भव्य मेळाव्यात होईल. या आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भातील जनतेच्या न्याय्य हक्कासाठी सरकारवर दबाव निर्माण केला जाणार आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:
🔹 प्रशासकीय विकेंद्रीकरण: स्वतंत्र विदर्भ राज्यात जिल्हे आणि तालुक्यांची संख्या दुप्पट करून प्रशासकीय कामात सुसूत्रता आणणे.
🔹 स्वतंत्र ‘व्ही.पी.एस.सी.’ (VPSC) बोर्डाची स्थापना करून विदर्भातील तरुण-तरुणींना सुमारे ३ लाख शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देणे.
🔹 विदर्भातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करणे आणि सिंचनाचा, ग्रामीण तसेच पांदण रस्त्यांचा प्रलंबित बॅकलॉग तातडीने भरून काढणे.
🔹 विदर्भ हा वीज निर्मितीत स्वयंपूर्ण आणि अतिरिक्त (Surplus) असल्याने, येथील जनतेला सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देणे.
🔹 औद्योगिक विकास: ओस पडलेल्या एमआयडीसीमध्ये विदर्भातील २३ प्रकारची खनिजे, वनसंपदा आणि शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारून स्थानिक रोजगाराला चालना देणे.
“विदर्भात जल, जंगल आणि जमीन मुबलक आहे, मात्र राजकीय अनास्थेमुळे आपला विकास खुंटला आहे. आता स्वतंत्र विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही,” असे प्रतिपादन संजय केवट यांनी केले.
या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी देवीदास लांजेवार, विजय नवखरे, भगवान झंझाड, भाऊराव बन्सोड, श्रीकृष्ण सपाटे, ज्ञानेश्वर आगासे यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने २२ फेब्रुवारीला नागपूर गाठावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




