किशोर साहू, मौदा, ता. २३ :- तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025- 26 मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विरशीच्या मुलींनी सर्व स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत तालुकास्तरावर वर्चस्व प्रस्थापित केले.
लंगडी व रिले या सांघिक स्पर्धांमध्ये विरशी शाळेच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला तर कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून आपली सांघिक ताकद सिद्ध केली. वैयक्तिक स्पर्धांमध्ये २०० मीटर धावणे व लांब उडी या दोन्ही स्पर्धांत सोनाली टेकाम हिने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच २८ किलो वजन गटात कु. शिवानी ठाकरे हिने द्वितीय क्रमांक पटकावून यशात भर घातली. याशिवाय मुलांच्या लांब उडी स्पर्धेत साहिल मेश्राम याने द्वितीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशात मानाचा वाटा उचलला.
या यशाबद्दल मुख्याध्यापक गौतम गणविर,पदवीधर शिक्षक नितीन कदम, सहाय्यक शिक्षक अन्नपूर्णा वंजारी व मनोज भगत तसेच केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी रामेश्वर भक्तवर्ती, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भारत सोनवणे व सर्व सदस्य, सरपंचा लक्ष्मी चौधरी व उपसरपंच पंकज वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








