– सावनेर मतदान केंद्रावर भाजपचा दबदबा डॉ. राजीव पोतदार यांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांत उत्साह
नागपूर :- नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान सावनेर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या उपस्थितीने भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सावनेर व खापा येथील नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार तसेच भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदानानंतर आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी मतदारांनी उत्स्फूर्तपणे बजावलेल्या मतदानाच्या हक्काचे कौतुक करत लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित केले. सावनेर मतदान केंद्रावर भाजपचा स्पष्ट प्रभाव दिसून आला. सावनेर नगरपालिकेत भाजपचे २४ सदस्य असून आघाडीचे २ सदस्य आहेत. विशेष म्हणजे सावनेर नगर परिषद काँग्रेसमुक्त असल्याने येथे भाजपची संघटनात्मक ताकद प्रकर्षाने जाणवली. खापा नगर परिषदेत भाजपचे १२ तर काँग्रेसचे ११ सदस्य असले तरी खापा येथील काही काँग्रेस नगरसेवकांनीही भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांना छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे सावनेर मतदान केंद्रावरून डॉ. राजीव पोतदार यांचे पारडे भक्कम असल्याचे चित्र दिसून आले. मतदानानंतर उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये विजयाचा प्रचंड आत्मविश्वास दिसून आला. यावेळी भाजप नेते रामराव मोवाडे, नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे, उपाध्यक्ष राजू घुगल, गटनेते रवींद्र ठाकूर, सभापती निलेश पटे, महेश चकोले, आशिष मानकर, अर्पना बागडे, सोनाली उमाटे, तसेच नगरसेवक डॉ. विजय धोटे, राजू भुजाडे, अरविंद ताजने, शालिक मोहतुरे, मंदार मंगळे, राजेश गुप्ता, दुर्गेश पारवे, रिमा बालाखे, नलिनी नारेकर, वनिता घुगल, सुचिता सुरे, मनीषा खंगारे, योगिता घोरमारे, कोकिळा जाधव, चित्रा वाठ, अश्विनी सय्याम, लक्ष्मी बागडे उपस्थित होते. तसेच खापा येथील नगराध्यक्षा पियुष राजेंद्र बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, गटनेते रवी परतेकी तसेच काँग्रेसचे गटनेते नामदेव गजभिये यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर अनेक पदाधिकारी व नगरसेवकांनी विजयाचे चिन्ह दाखवत महायुतीच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला.
सावनेर आणि खापा येथील मतदारांनी दाखविलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा भाजप महायुतीवरील विश्वासाचा पुरावा असून नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद पोटनिवडणुकीत डॉ. राजीव पोतदार यांना भक्कम पाठिंबा मिळाल्याचे चित्र या मतदानातून स्पष्टपणे दिसून आले.



