spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गट ग्रामपंचायत भागेमहारीत दशपर्णी अर्क निर्मितीला वेग; नैसर्गिक शेतीच्या चळवळीत महिला शेतकरी आघाडीवर

पारशिवनी :- वाढता उत्पादन खर्च, रासायनिक खतांवरील वाढते अवलंबित्व आणि शेतीमालाच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पारशिवनी तालुक्यात नैसर्गिक शेतीचा जागर वेगाने रुजत आहे. कृषि विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या संयुक्त पुढाकारातून गट ग्रामपंचायत भागेमहारी येथे नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांचा त्यात उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

विषमुक्त अन्न उत्पादन, जमिनीची सुपीकता वाढविणे आणि शेतीचा खर्च कमी करणे या उद्देशाने गावात दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत, गांडूळखत यांसह स्थानिक उपलब्ध नैसर्गिक घटकांपासून जैविक उत्पादने तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विशेष म्हणजे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांनी सामूहिक पद्धतीने दशपर्णी अर्क निर्मितीचा उपक्रम हाती घेतला असून, सरपंच सौ. ज्योती प्रेम भोंडेकर यांच्या पुढाकारामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे.

तालुका कृषि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिला एकत्र येऊन दशपर्णी अर्क तयार करत आहेत. आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन नैसर्गिक कीडनियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या निंबोळी अर्काच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात निंबोळ्यांचे संकलनही करण्यात येत आहे. त्यामुळे जैविक कीडनाशकांची स्थानिक पातळीवर उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना कमी खर्चात, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती करता यावी यासाठी कृषि विभागाकडून सातत्याने प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन दिले जात आहे. यासोबतच उत्पादन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने गांडूळखत, जीवामृत, बेलफळांपासून पोटॅश तसेच पळसाच्या फुलांपासून बोरॉन तयार करण्यासारखे नाविन्यपूर्ण प्रयोगही राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांमुळे नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर वाढत असून रासायनिक निविष्ठांवरील खर्चात लक्षणीय घट होत आहे. परिणामी शेतकरी स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत असून नैसर्गिक शेतीबाबतचा विश्वास अधिक दृढ होत आहे.

कृषि विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांना भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, गट ग्रामपंचायत भागेमहारीसह संपूर्ण पारशिवनी तालुक्यात नैसर्गिक शेतीची चळवळ अधिक व्यापक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Popular Articles