spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

NEET फेरपरीक्षेसाठी पोक्सो प्रकरणातील १८ वर्षीय आरोपीला चार दिवसांचा तात्पुरता जामीन

मुंबई :- अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या १८ वर्षीय तरुणाला आगामी नीट फेरपरीक्षेला बसता यावे यासाठी मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाने चार दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी गुरुवारी हा आदेश दिला. संबंधित आरोपी सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. २१ जून रोजी होणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी त्याने तात्पुरत्या जामिनाची मागणी केली होती.

सुनावणीदरम्यान पीडित मुलीने जामिनाला कोणतीही हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, जामिनाच्या कालावधीत आरोपीने तिच्या कुटुंबीयांची बदनामी करू नये किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे धमकावू नये, अशी अट घालण्यात आली.

न्यायालयाने आरोपीला १८ जून ते २१ जून या कालावधीसाठी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. तसेच परीक्षा पूर्ण झाल्यानंतर २२ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत कारागृह प्रशासनासमोर हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

या तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच ‘बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण’ कायदा, २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. जामिनावर असताना आरोपीने पीडितेशी कोणताही संपर्क साधू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये किंवा प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला धमकावू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याशिवाय, तो नीट फेरपरीक्षेला निश्चितपणे उपस्थित राहील, असे हमीपत्र सादर करण्यास तसेच कारागृहात परतताना परीक्षेला बसल्याचे पुरावे दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Popular Articles