spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

थोडी जरी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचा घणाघात

मुंबई :- केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या बळावर भाजप व शिंदे गटाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. स्वतःची राजकीय बोली लावून दुसऱ्या पक्षात गेलेल्यांना जर थोडीही लाज असेल, तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे, असे आव्हान त्यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

राऊत म्हणाले की, शिवसेना फुटली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एखाद्या विचारसरणीसाठी किंवा वैचारिक मतभेदांमुळे पक्ष सोडला, तर त्याला फूट म्हणता येईल. मात्र, सत्तेच्या आणि पैशांच्या मोहापायी स्वतःला राजकीय बाजारात विकणे ही वेगळी बाब आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षातील सहा खासदारांनी स्वतःची बोली लावली आणि त्यांना विकत घेतले गेले, असा आरोप त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांकडे ठेकेदारी आणि महाराष्ट्राच्या लुटीतून मिळालेला अमर्याद पैसा असल्याने हा प्रकार घडत असल्याचे सांगत हा माजही जनतेकडून उतरवला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पक्षांतर केलेले खासदार अद्याप मुंबईत आले नसून त्यांच्यात मंत्रीपदावरून वाद सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला. मंत्रीपद एका व्यक्तीला मिळेल, तर उर्वरितांना आर्थिक स्वरूपात भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या कृतीमागे विचारसरणी किंवा बंडखोरी नसून केवळ स्वार्थ असल्याचा आरोप त्यांनी केला. या खासदारांच्या मतदारसंघांत त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त होत असून त्यांना पोलीस संरक्षणात राहावे लागत असल्याची टीकाही राऊत यांनी केली. जर कुठलाही गुन्हा किंवा चुकीचे कृत्य केलेले नसेल, तर पोलीस बंदोबस्ताची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळत असताना आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना पोलीस यंत्रणा गद्दारांच्या संरक्षणासाठी वापरणे म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचे त्यांनी म्हटले. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकर्ते आणि मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले.

दरम्यान, शिवसेना काँग्रेससोबत गेल्यामुळे काही खासदारांनी पक्ष सोडल्याच्या वक्तव्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष असल्याची माहिती संबंधित खासदारांना आधीपासून होती आणि त्याच आघाडीच्या पाठिंब्यावर ते निवडून आले होते, असे त्यांनी नमूद केले.

याचबरोबर काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला, असे सांगत भाजपमधील किती जणांनी देशासाठी त्याग केला आहे, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Popular Articles