spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विकसित महाराष्ट्र’साठी व्यापक दृष्टिकोनातून जबाबदारी स्वीकारून काम करावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे

मुंबई :- शासकीय अधिकाऱ्यांनी बदलत्या काळानुसार नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वतःला भविष्यासाठी सज्ज करावे. त्याचप्रमाणे ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने व्यापक दृष्टिकोन ठेवून, समन्वयाने आणि जबाबदारी स्वीकारून काम करावे, असे आवाहन महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोजित ‘फ्रॉम फाईल्स टू फ्यूचर’ प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्र्यांचे खासगी सचिव प्रवीण महाजन, अपर मुख्य सचिवांचे विशेष कार्य अधिकारी शिवाजी पाटील, विभागाचे सहसचिव संपत सूर्यवंशी, भगवान सावंत, सत्यनारायण बजाज, कैलास गायकवाड, संजय बनकर, श्रीराम यादव, मनीषा जायभाये, उपसचिव अश्विनी यमगर, गौरी म्हस्के यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव खारगे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता असते. त्यामुळे त्यांनी इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतःची क्षमता ओळखून मार्गक्रमण करावे. प्रशासकीय कामकाजात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःहून जबाबदारी स्वीकारल्यास अनुभव मिळतो, आत्मविश्वास वाढतो, नेतृत्वगुण विकसित होतात, विश्वासार्हता वाढते आणि बदल घडविण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले. स्वतःला भविष्यासाठी सज्ज करण्याकरिता शासनाच्या निःशुल्क ‘iGOT’ प्रशिक्षण व्यासपीठावरील अभ्यासक्रमांचा नियमित लाभ घ्यावा. वाचन, श्रवण आणि दृक्‌माध्यमांतून सातत्याने शिकण्याची सवय लावावी, असे सांगून तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामकाजात गती, पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढते, त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचाही स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विभागांशी तसेच संबंधित व्यक्ती व संस्थांशी समन्वय ठेवून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. विकसित राष्ट्रांमध्ये कार्यपद्धती आणि व्यवस्था निश्चित स्वरूपात कार्यरत असल्याचे तसेच सहकार्याची भावना जोपासली जात असल्याचे पाहायला मिळते याचा उल्लेख करून व्यक्ती बदलत असल्या तरी यंत्रणा सक्षम आणि कार्यक्षम राहणे गरजेचे असल्याने महसूल विभागात या दृष्टीने बदल घडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

महसूल विभाग हा शासनाचा कणा असून, समाजपरिवर्तन आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन संवेदनशीलतेने काम करावे आणि प्रत्येक कामातून समाजाला होणारा लाभ लक्षात घेऊन ‘विकसित महाराष्ट्रा’साठी योगदान द्यावे, असे आवाहन खारगे यांनी यावेळी केले.

Popular Articles