spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिला बचत गटातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन; शंकरपुर येथे महिला मुक्ती व बालिका दिन साजरा

साकोली :- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीचे औचित्य साधून, साकोली तालुक्यातील शंकरपुर/वडेगांव येथील महिला बचत गटांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महिला मुक्ती दिन आणि बालिका दिन साजरा करत सावित्रीबाईंच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

३ जानेवारी रोजी स्थानिक बौद्ध विहार परिसरात सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला मुक्ती दिनानिमित्त आयोजित चर्चेत स्त्रियांनी सामूहिक सक्षमीकरणातून आपले हक्क, न्याय आणि सामाजिक-आर्थिक समानतेसाठी जनजागृती करण्याचा संकल्प सोडला.

बालिका दिनानिमित्त गावातील लहान मुलींना एकत्रित करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात आली. ‘शिक्षण हाच प्रगतीचा पाया आहे,’ हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाला नवरत्न महिला बचत गटातील सर्व महिला पदाधिकारी, विविध गटांच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव, खजिनदार आणि गावातील मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरणाला अधिक बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Popular Articles