बंगळूरु ता ३ : कर्नाटकाची राजधानी बंगळूरुच्या बाहेरील भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चप्पलमध्ये लपलेल्या सापाने दंश केल्याने एका सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हे धक्कादायक प्रकरण बंगळूरु बाहेरील बन्नेरघट्टा रिसर्व फॉरेस्टजवळ घडले आहे. मंजू प्रकाश (वय ४१) नावाचे सॉफ्टवेअर कर्मचारी त्यांच्या घराबाहेर ठेवलेल्या क्रॉक्स चप्पलमध्ये लपलेल्या सापाने दंश केल्यामुळे मरण पावले. मंजू प्रकाश हे काही दिवसांपासून घरूनच काम करत होते आणि एका आठवड्याच्या सुट्टीवर होते.
सापाचा अंदाजही नव्हता
रविवारी दुपारी मंजू प्रकाश ज्यूस पिण्यासाठी घराबाहेर पडले आणि त्यांनी बाहेर ठेवलेली चप्पल घातली. काही वेळाने ते घरी परतले. त्यांनी आईला ज्यूसचा पॅकेट दिला आणि खोलीत झोपायला गेले. त्यांना चप्पलमध्ये साप लपलेला आहे, याचा अजिबात अंदाज नव्हता.
साप चावल्याचेही कळले नाही
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात त्यांच्या पायाची संवेदना गेली होती. त्यामुळे त्यांना साप चावल्याचे अजिबात जाणवले नाही. घराच्या जवळ बांधकाम करणाऱ्या मजुराने चप्पलमध्ये साप पाहिला आणि कुटुंबीयांना माहिती दिली. जेव्हा चप्पल बाहेर काढली, तेव्हा त्यातील साप मृत अवस्थेत होता.
तोंडातून फेस येत होता
आईने मुलाला उठवण्यासाठी खोलीत जाऊन पाहिले, तेव्हा मंजू प्रकाश यांच्या तोंडातून फेस येत होता आणि सापाच्या विषामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीय आणि परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.
सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगा
विषारी सापांचा प्रजनन काळ (ब्रीडिंग टाईम) सुरू आहे, त्यामुळे ते अन्न आणि ऊब शोधण्यासाठी बाहेर पडतात, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे, तुम्ही कोणतेही बूट किंवा चप्पल घालण्यापूर्वी त्यात कोणताही जीव लपलेला नाही ना, याची खात्री करा. ही छोटीशी खबरदारी मोठी दुर्घटना टाळू शकते.




