spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनीच पुढे येण्याची गरज  – उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन

– महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनीच पुढे येण्याची गरज  – उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन

– स्वयंसिद्धा – विजया परिषदेचे उदघाटन

– राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर :- महिला सक्षमीकरण ही केवळ एखादी संस्था, विद्यापीठ किंवा महाविद्यालये यांचीच जबाबदारी नाही, तर समाजातील सर्व घटकांसह कुटुंबांचाही सहभाग महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी येथे केले.

नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित स्वयंसिद्धा विजया या दोन दिवसीय महिला सक्षमीकरणावरील परिषदेचे उदघाटन आज नागपुरातील नॅशनल फायर कॉलेजच्या सभागृहात उपराष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाच महिला सक्षमीकरणाचा हा स्वयंसिद्धा उपक्रम सुरू झाला होता. त्यामुळे त्याविषयी अधिक ममत्व असल्याचे सांगून उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा या उपक्रमासाठीचा पुढाकार अभिनंदनीय आहे. आज या उपक्रमाचा झालेला विस्तार पाहून मला आनंद होतो. समाजातील चांगले लोक, चांगल्या कल्पना यांना जोडणारे विद्यापीठ हे एक प्रभावी केंद्र आहे. भारतात ब्रिटिश शासनानंतर महिलांना विविध क्षेत्रात संधी मिळू लागल्या असे बोलले जाते मात्र ते खरे नाही. प्राचीन काळातही झाशीच्या राणीसह अनेक महिलांनी विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे आपल्याला इतिहासात दिसते. भारतीय संस्कृतीने नेहमीच महिलांचा सन्मान केला. मातेला देवाचा दर्जा देणारी आपली संस्कृती असल्याचे श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या अनेक भागात विद्यापीठांच्या दीक्षांत सोहळ्यांना आपण जात असतो. तेथे सुवर्ण पदक मिळविणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आढळते. शिक्षणात महिलांच्या यशस्वी सहभागाचा हा दाखला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला वेगाने पुढे येत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. महिला सक्षमीकरणात विद्यापीठांची भूमिका मोलाची आहे. आज येथे होत असलेली ही परिषद सर्वांसाठीच प्रेणादायी असल्याचेही सी.पी. राधाकृष्णन यावेळी म्हणाले.

सर्वच क्षेत्रात विद्यार्थी घडविण्यास विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

अशा परिषदांच्या माध्यमातून महिलांचा कौशल्य विकास होऊन त्या स्वतःचे उद्योग सुरू करू शकतील, असे सांगून राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, या परिषदेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला तसाच पुढाकार अन्य विद्यापीठांनीही घ्यायला हवा. आर्थिक स्वातंत्र्य, कौशल्य विकास, नेतृत्व अशाच सर्वच क्षेत्रात विद्यापीठांनी विद्यार्थी घडविले पाहिजे. महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य व्हावे, अशी आपली अपेक्षा आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

व्यासपीठावर राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे व कुलसचिव डॉ. विजय खंडाळ उपस्थित होते. माजी कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव, पद्मश्री जे. कल्पना सरोज, नीना गोगाटे, प्रतिभा देसाई, डॉ. शालिनी लिहितकर यांचा यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले. शिक्षणातून महिला सक्षमीकरणाचा राष्ट्रीय विचारमंच असलेल्या या परिषदेत देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू, प्रशासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले आहेत.

Popular Articles