गडचिरोलीत मासेमारी करताना युवक बुडाला प्रशासनाने घेतली दखल

0
45

गडचिरोली १६ : गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील गोगावजवळ वैनगंगा नदीत मासेमारी करताना खोल पाण्यात गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत व्यक्तीची ओळख विकास बिसन मेश्राम (राहिवासी: धीमार मोहल्ला, गडचिरोली) अशी झाली आहे. गुरुवारी सकाळी मासेमारीसाठी तो आणि त्याचा मित्र नदीत गेले असताना हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजता मासे पकडताना विकास खोल पाण्यात गेला आणि पोहताना तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा मित्राने तात्काळ गोगाव गावातील नागरिकांना आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. नायब तहसीलदार चंदू प्रधान यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी रूपेश गोरेवार, ग्राम महसूल अधिकारी वैकुळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, सुनील चव्हाण यांच्यासह पथकाने शोध मोहीम सुरू केली. मात्र, संध्याकाळपर्यंत विकासचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. रात्रीची वेळ आणि अंधारामुळे शोध कार्य थांबवण्यात आले असून, शोध मोहीम शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रधान यांनी दिली. स्थानिक प्रशासनाकडून या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आला असून, घटनास्थळी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.