spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तरुणाई रंगली कुंचल्यात

– मनपाच्या रंग दे नागपूर भित्तीचित्र स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित रंग दे नागपूर या भित्तीचित्र स्पर्धेला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुण चित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या तरुण चित्रकारांनी नागपूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व नागपुरातील वारसा स्थळांचा नीरी मार्ग व फ्रिडम पार्कच्या भिंतींवर कु़ंचल्याच्या रंगातून नागपूरचा वैभवशाली इतिहास जिवंत केला. विशेष म्हणजे, चित्रकारांचा उत्साह वाढवीत आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी फ्रीडम पार्क पुढील जुना मॉरेस कॉलेज टी पॉईंट ते मानस चौक दरम्यानच्या सीताबर्डी किल्ल्याच्या भिंती वर सुरू असलेल्या स्पर्धा स्थळी स्वतः चित्र रेखाटत स्पर्धेचे उद्घाटन केले.

मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त  पंत यांच्या देखरेखीत ‘रंग दे नागपूर’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेला शनिवार पासून सुरूवात झाली आहे. ११ व १२ ऑक्टोबर या दोन दिवसात चित्रकार भित्तीचित्रे पूर्ण करणार आहेत. या माध्यमातून मनपाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्याचे दर्शन घडविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. १८ वर्षांवरील विद्यार्थी आणि व्यावसायिक अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येत असून, यात विद्यार्थी गटामध्ये बीएफए, एम एफ ए. एटीडी, गीडी फाईन आर्ट विद्यार्थी यांचा तर व्यावसायिक गटात हौशी चित्रकार आणि फाईन आर्टचे पदवीधर (उत्तीर्ण विद्यार्थी) यांचा समावेश आहे.

स्पर्धेत सहभागी होत नागपूरसह मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यातून आलेल्या चित्रकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. या स्पर्धेसाठी एकूण ११८ गटांनी प्रवेशिका दिल्या होत्या. त्यापैकी ९२ जणांच्या प्रवेशिका मनपाने दिलेल्या संकल्पनेनुसार पात्र ठरल्या आहेत. प्रत्येक गटामध्ये ३ ते ५ चित्रकारांचा समावेश आहे. जवळपास तीनशेच्या वर चित्रकारांनी एकाचवेळी नागपुरातील या रंगोत्सवात सहभाग नोंदविला.

अशा आहेत संकल्पना

रंग दे नागपूर स्पर्धेसाठी १) ‘नागपूर ॲट ७५’: अनेक दशकांतील वाढीचा आणि परिवर्तनाचा प्रवास, २) ‘स्वच्छ, हरित आणि स्मार्ट नागपूर’: स्वच्छता, हिरवळ आणि स्मार्ट सिटी विकास, ३) नागपूरची संस्कृती, इतिहास आणि वारसा आणि ४) ‘नागपूर- द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ या चार संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत.

चित्रकला विद्यार्थ्यांचा उत्साह

दीक्षाभूमीजवळील सुंदरलाल राय मार्ग (नीरी मार्ग), सीताबर्डीतील फ्रिडम पार्क येथील भिंतीवर तरुण चित्रकारांनी भित्तीचित्रे काढण्यास सुरुवात केली. नीरी मार्गावर विद्यार्थी तर फ्रिडम पार्कवर हौशी तसेच व्यावसायिक चित्रकारांनी भित्तीचित्रे काढली.

नागपुरातील शासकीय चित्रकला महाविद्यालय, अंजुमन कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, महालक्ष्मी जगदंबा कॉलेज, नटराज आर्ट अँड कल्चर कॉलेज, धरमपेठ, ऑरटॉनिक संस्था मानेवाडा, शासकीय चित्रकला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. नागपुरातील शासकीय चित्रकला विद्यालय, नटराज आर्ट अँड कल्चर कॉलेजमधील प्राध्यपकांनी तसेच इतर हौशी चित्रकारांनी यात सहभाग घेतला. आर्णी (यवतमाळ) येथून प्रियंका प्रेम राठोड या स्पर्धेसाठी आल्या आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर शासकीय चित्रकला महाविद्यालयातील श्रद्धा सोनवणे, साक्षी पठारे, संकेत गायकवाड, गायत्री काळे व गौरव गवळी यांनी या स्पर्धेत भाग घेतला. ठाणे येथील चित्रकार सुरेंद्र कोहपरे यांनी या स्पर्धेत भाग घेतला.

लोकांमध्ये उत्सुकता

सकाळपासून या दोन्ही ठिकाणी चित्रकार दाखल झाले होते. नागपूर महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या टी शर्ट परिधान करून सर्व चित्रकार चित्र काढताना या मार्गांवरून जाणारे वाहनचालक उत्सुकतेने पाहत होते तर काही जण थांबून सेल्फी काढताना दिसून आले.

आयुक्तांच्या हातात कुंचला

महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी स्पर्धा स्थळी भिंतीवर काढत असलेल्या भित्तीचित्र स्पर्धेतील स्पर्धकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चित्रकारांच्या चित्रकलेचे कौतुक केले तसेच शुभेच्छा दिल्या. यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी कुंचला हातात घेऊन फिरविला. यावेळी उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, स्पर्धेचे समन्वयक  अभिजीत मौंदेकर उपस्थित होते.

मनपाच्या उपक्रमाचे कौतुक

या स्पर्धेत सहभागी झालेल्या चित्रकारांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. नागपुरातील शासकीय चित्रकला महाविद्यालयातील प्रा. अश्विनी घुले म्हणाल्या, महापालिकेचा हा उपक्रम खूपच चांगला आहे. अमृत महोत्सवानिमित्त होत असलेला ही स्पर्धा केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर हौशी चित्रकारांसाठी सुद्धा नागपूरच्या विकासाला चित्रबद्ध करण्याची संधी मिळाली आहे.

अभिनव संकल्पना – कोहपरे

ठाणे येथून खास या स्पर्धेसाठी आलेले सुरेंद्र कोहपरे यांनी नागपूर महपालिकेची ही संकल्पना अत्यंत अभिनव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी असे उपक्रम राबविले जाणे चांगले तसेच चित्रकारांना सुद्धा आपल्या संकल्पांना मूर्त रुप देण्याची संधी अशा उपक्रमातून मिळत असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक

नागपुरातील शासकीय चित्रकला महाविद्यालयात एमएफएच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या प्रियंका प्रेम राठोड हिनेही या उपक्रमाचे कौतुक केले. चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी महत्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले.

विशेष बक्षिसे..

स्पर्धेतील विद्यार्थी गटातील विजेत्यांना १ लाख रुपयांचे पहिले बक्षीस, ७५ हजार रुपयांचे दुसरे बक्षीस आणि ५० हजार रुपयांचे तिसरे बक्षीस दिले जाणार आहे. तर व्यावसायिक गटातील विजेत्यांना १ लाख २५ हजारांचे पहिले बक्षीस १ लाख रुपयांचे दुसरे बक्षीस आणि ७५ हजार रुपयांचे तिसरे बक्षीस दिले जाणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.