spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नरेंद्र मोदी यांच्या रौप्यमहोत्सवी कारकिर्दीनिमित्त निघणाऱ्या सेवा यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे

– भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आवाहन

सेवा समाज आणि राष्ट्र निर्माणसाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रौप्यमहोत्सवी कारकिर्दीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानात युवा मोर्चाच्या संकल्पनेतून वडनगर – वाराणसी आणि वाराणसी – वडनगर दरम्यान निघणाऱ्या सेवायात्रेत राज्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत महाडिक म्हणाले, शासनप्रमुख म्हणून मोदी यांच्या 25 वर्षाच्या कार्यकाळात शिकलेली तरुण पिढी अतिशय प्रेरणादायी असल्याने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे ही सेवा यात्रा राष्ट्रीय पातळीवर राबवण्यात येत आहे. युवा मोर्चाचे देशभरातले हजारो युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सेवा यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेचे वेगवेगळे 20 मार्ग वडनगर – वाराणसी आणि वाराणसी – वडनगर दोन्ही दिशेने जातील. यात्रेत प्रत्येक मार्गावर 25 मोटरसायकलस्वार आणि 50 सेवायात्री सहभागी होतील. वडनगर – वाराणसी आणि वाराणसी – वडनगर या मार्गावर ही यात्रा काढण्याचे कारण वडनगर ही नरेंद्र मोदी यांची जन्मभूमी आहे आणि वाराणसी येथील ते लोकसभेचे खासदार असल्याने या ठिकाणी त्यांचे कामकाज यशस्वीपणे सुरु आहे.

गुजरातमधील वडनगरमधून निघणारे सर्व मार्ग गुजरातमधील पवित्र नद्यांमधील जल घेऊन वाराणसीला पोहोचतील. तेथे काशी विश्वनाथ धाममध्ये जलाभिषेक करतील तर आणि उत्तर प्रदेशातील सर्व मार्ग संपूर्ण उत्तर प्रदेशाच्या पवित्र नद्यांमधील जल घेऊन गुजरातमध्ये आल्यानंतर हटकेश्वर महादेव मंदिर येथे जलाभिषेक केला जाणार आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’, हा पंतप्रधानांचा संदेश देशातील युवापिढीला देण्यासाठी या यात्रेत वेगवेगळ्या क्षेत्रातून, संस्कृतीतून देशभरातले युवक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहार अशा दहा विविध राज्यांमधून जाणारी ही यात्रा एकूण 193 जिल्हे, 773 तालुके आणि 1,159 गावांमधून जाणार आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमधून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही यात्रा जाणार असल्याची माहिती महाडिक यांनी दिली.

केवळ गावागावात पोहोचणेच हे या यात्रेचे उद्दिष्ट नाही तर प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्यातरी पद्धतीची सेवा करावी यासाठी या यात्रेला सेवा यात्रा नाव देण्यात आले आहे. या यात्रेत वेगवेगळ्या प्रकारचे 20 ते 25 सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील. त्यात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, नशामुक्त भारत, टीबीमुक्त भारत यांचा समावेश आहे तर साधुसंतांचा आणि साफसफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल. जल संरक्षणासंदर्भात प्लास्टिक मुक्तीची जागरूकता निर्माण करण्यासाठी युवा पिढीपर्यंत पोहोचणार तर अनेक ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, धान्य, फळवाटप, रुग्णांना मदत असे अनेक सामाजिक उपक्रम यात्रेच्या माध्यमातून राबवले जातील आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमांग जोशी सहभागी होणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील 50 तरुण या यात्रेत सहभागी होण्यासाठी वडनगरला पोहोचले असून आज सकाळी सुरु झालेली ही यात्रा वेगवेगळ्या राज्यांमध्ये युवकांशी संवाद साधून राष्ट्र निर्माणाचा संदेश युवा मोर्चाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. आज 17 सप्टेंबरपासून सुरु होत 7 ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या या यात्रेत सहभागी होत सेवा आणि संपर्काची संधी साधावी, असे आवाहन महाडिक यांनी महाराष्ट्रासह देशातील युवक – युवतींना केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.