spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाडकी बहीण योजनेत ₹4,800 कोटींचा घोटाळा: सुप्रिया सुळेंचा ‘बॉम्बगोळा’, डिजिटल इंडियावर प्रश्नचिन्ह!

 

पुणे २९ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल ₹4,800 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना थेट आकड्यांसहित हा भ्रष्टाचार समोर आणला, ज्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुरुषांनी लाभ घेतलाच कसा? सुळेंचा थेट सवाल

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत करणे असताना, पुरुषांनी या योजनेचा लाभ कसा घेतला, असा रोकडा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, सरकारने दिलेल्या आकडेवारीतूनच हा गंभीर घोळ समोर आला आहे. “इतक्या चाळण्या असताना, आधार कार्ड, बँक डिटेल्स तपासले जात असताना, पुरुषांच्या खात्यात पैसे कसे जमा झाले?” असा सवाल करत त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

DBT आणि डिजिटल इंडियाच्या कारभारावर आक्षेप

सुप्रिया सुळे यांनी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर (DBT) प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही गंभीर आक्षेप घेतला आहे. DBT प्रणालीतून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात, यासाठी अनेक नियम आणि कसून तपासणी प्रक्रिया असते. असे असतानाही पुरुषांच्या खात्यात पैसे वळते होणे हे ‘डिजिटल इंडिया’चे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’च्या कारभारावरही थेट निशाणा साधला, “जर DBT मधून पुरुषांच्या खात्यात पैसे जात असतील, तर डिजिटल इंडियाचा फायदा काय?”

आदिती तटकरेंवर आरोप नाही, पण संशयाची सुई कोणावर?

या घोटाळ्याबाबत बोलताना, सुप्रिया सुळे यांनी आपण राज्याच्या संबंधित खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर खोटे आरोप करणार नाही, असे स्पष्ट केले. “मी कोणावरही खोटे आरोप करत नाही, करणार नाही. सरकार कसे चालते हे मला माहिती आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यामुळे त्यांच्या संशयाची सुई कोणावर आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

सुळे यांनी राज्य सरकारने या घोटाळ्याची सामूहिक जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. या गंभीर आरोपांवर आता सरकारी गोटातून काय प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हा घोटाळा कुणी केला, कसा केला, त्यात कोणाचा सहभाग आहे, यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Popular Articles