spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शक्ती-भक्ती-संस्कार कुंभात १० हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार

यवतमाळ :- यवतमाळ शहरातील गीता परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “शक्ती-भक्ती-संस्कार कुंभ” या भव्य कार्यक्रमात तब्बल १० हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामूहिक सूर्यनमस्कार आणि भगवद्गीतेचे पठण केले. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता येथील नेहरू स्टेडियममध्ये पार पडला.

या कार्यक्रमाला स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्या उपस्थितीत भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. कार्यक्रमात शहरातील ३५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध उपक्रम सादर केले. यामध्ये सूर्यनमस्कार, मल्लखांब, योगासन, “ऑपरेशन सिंदूर” आणि मर्दानी खेळ अशा पारंपरिक व शारीरिक क्रीडाप्रकारांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर गीता परिवाराचे जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मदन येरावार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, विदर्भ प्रांत प्रमुख शोभा हरकुट यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वदेशीचा अवलंब, दररोज सूर्यनमस्कार करण्याची सवय, देश प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प आणि सामाजिक समरसता वाढविण्याचे संदेश देणारी सुमारे १२ हजार पत्रे लिहिली. या पत्रांच्या पाठवणीचा शुभारंभ स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. ही सर्व पत्रे नरेंद्र मोदी यांना पोस्टद्वारे पाठविण्यात आली.

यावेळी गीता परिवारचे डॉ. स्नेहल राशीतवार, डॉ. मीनल राशीतवार, जिल्हा उपाध्यक्ष तसेच योग शिक्षक प्रेमदास पकडे, डॉ. निकिता चव्हाण, डॉ. महेश चव्हाण, सचिव श्रीकांत मानकर, शुभांगिनी बोडखे, रविकांत चौधरी, दर्शन जाजू,मनमोहन भोयर,क्रांती अलोन, उन्नती औतकर, कल्पेश काकडे, जानवी गोफणे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या भव्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, संस्कार आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.