spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जरीपटका येथे १०२ पोती तांदूळ जप्त

संदीप कांबळे, कामठी :- जरीपटका पोलिसांनी साई मंदिर परिसरात कारवाई करीत तांदळ्याची १०२ पोती भरलेले मालवाहू वाहन ताब्यात घेतले. रेशन दुकानाशी संबंधित धान्याची अनधिकृत वाहतूक होत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेला तांदूळ व वाहन जरीपटका पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असून, धान्याचा स्रोत आणि वाहतुकीची वैधता तपासण्यासाठी प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई मंदिराजवळ संशयास्पदरीत्या आढळलेल्या मालवाहू वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाची पोती आढळून आली. मोजणी केल्यानंतर १०२ पोती तांदूळ असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ वाहनासह तांदूळ ताब्यात घेतला.

जप्त करण्यात आलेला तांदूळ रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा भाग आहे का, याचा तपास आता संबंधित विभागाकडून केला जाणार आहे. यासाठी धान्याची खरेदी, वाहतूक व वितरणासंदर्भातील कागदपत्रे, बिले तसेच मालाच्या मूळ स्रोताची माहिती तपासली जाणार आहे.

दरम्यान, जप्त तांदळाची तपासणी व विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे १०२ पोती तांदूळ नेमका कुठून आला आणि तो कुठे नेण्यात येत होता, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

– रेशनच्या धान्याच्या काळ्याबाजाराचा संशय?

स्थानिक पातळीवर रेशन दुकानातून मिळणारे धान्य पुढे विक्रीसाठी नेले जात असल्याची चर्चा होत असली, तरी या प्रकरणात रेशनच्या धान्याचा काळाबाजार झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. एफडीएच्या तपासणीनंतरच धान्याचा नेमका स्रोत आणि त्याची वाहतूक नियमबाह्य होती की नाही, हे स्पष्ट होणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.