सावनेर :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजलि योग परिवार सावनेर व नगरपरिषद सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद प्रांगणात भव्य सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सावनेर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संजना मंगळे होत्या. यावेळी मुख्याधिकारी अर्शिया जूही, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, नगर उपाध्यक्ष राजू घुगल, निलेश पटे, राजू भुजाडे तसेच सुचिता सूरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पतंजलि योग समितीचे मुख्य योग प्रशिक्षक भरत थापा यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसाधनेची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पतंजलि योग समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये कैलाश शर्मा, मनोहर दिवटे, चैतन्य ठाकरे, राहुल सावजी, गुलाबराव टेकाडे, अरुण रुषीया, मदन शेंडे, सुरेश चरपे, महिला प्रभारी मानवती थापा, सहप्रभारी विविधा उमाठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वेदश्री देशपांडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रख्यात कवी जयसियाराम यादव यांनी मानले.
उत्साह, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या वातावरणात योग दिन कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या सहभागामुळे योग संस्कृतीचा प्रसार तसेच आरोग्यदायी जीवनशैलीबद्दलचा वाढता सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला




