मुंबईत 30 सप्टेंबर रोजी 132 वी डाक अदालत

0
99

– तक्रारी पाठविण्यासाठी 19 सप्टेंबर पर्यंत मुदत

नवी मुंबई :- पोस्टल सेवेला अधिक सक्षम व जनसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यातील तक्रारींना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सर्कलतर्फे 132 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर, जनरल, दूसरा मजला मुंबई येथील कार्यालयात भरविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोस्ट ऑफीस अधीक्षक, नवी मुंबई विभग, वाशी यांनी दिली आहे.

पोस्टाची सेवा ही सामाजिक-आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देतांना, संभाषणामध्ये / पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटींमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाड़ा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.

डाक अदालत ही ग्राहकांच्या तक्रारींवर तत्काळ आणि न्याय तोडगा काढण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरते. ग्राहकांना टपाल सेवांमध्ये आलेल्या अडचणी, वस्तूंचे नुकसान, न मिळालेल्या मनीऑर्डर/बचत बँक खाते/प्रमाणपत्र इत्यादींसंबंधी तक्रारी या न्यायमंचात मांडता येतात. तसेच मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींचे निराकरण यामध्ये केले जाते.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी सबंधित पोस्टाच्या सेवे विषयी किंवा कामकाजाब‌द्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बैंक खते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवीली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी.

सबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ग्राहक संतुष्टि) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जीपीओ बिल्डिंग, जीपीओ कॉम्पलेक्स, पहिला मजला, मुंबई 500 001 यांच्या नावे दोन प्रतीत दिनांक 19 सप्टेंबर 2025 पर्यंत अथवा त्यापूर्वी पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन वरिष्ठ पोस्ट ऑफीस अधीक्षक, नवी मुंबई विभग, वाशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.