spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्ह्यात धान खरेदीसाठी १९१ केंद्रे सुरू

हंसराज,भंडारा :- खरीप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, भंडारा जिल्ह्यात धान खरेदीसाठी एकूण १९१ केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये ‘अ’ वर्गातील १० आणि ‘ब’ वर्गातील १८१ संस्थांच्या धान खरेदी केंद्रांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामासाठी धानाची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल २ हजार ४४१ रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासनाच्या BeAM पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी या केंद्रांवर धान विक्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार आणि प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, खरीप पणन हंगाम २०२६-२७ पासून आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी ॲग्रीस्टॅक (Agri Stack) प्रणालीद्वारे करणे आवश्यक आहे. BeAM पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी झालेली असणे बंधनकारक आहे. ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांनाच BeAM पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

धान उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना प्रत्यक्ष उपस्थित राहून लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी चालू हंगामातील पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, नमुना ८-अ, अद्ययावत बँक पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश, अद्ययावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड ही कागदपत्रे सोबत आणावीत.

शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील जवळच्या पणन महासंघाच्या ‘अ’ वर्ग किंवा ‘ब’ वर्ग सभासद संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन खरीप पणन हंगाम २०२६-२७ मध्ये धान विक्रीसाठी नावाची ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार आणि प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी केले आहे.

Popular Articles