हंसराज,भंडारा मोहाडी :- तालुक्यातील धोप येथील शेतकरी स्व. राजेन्द्र अमरकंठ सपाटे यांच्या आत्महत्येने परिसरात शोककळा पसरली होती. शेतीतील संकट, पिकांच्या नुकसानीची चिंता आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची विवंचना यामुळे त्यांच्यावर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगाने सर्वांनाच हेलावून सोडले होते. या घटनेनंतर आमदार नाना पटोले यांनी सपाटे यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी कुटुंबाला आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते.
दिलेल्या शब्दाची पूर्तता करत आमदार नाना पटोले यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सपाटे कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. आमदार नाना पटोले यांचे प्रतिनिधी सोनू फेंडरकर आणि जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे यांच्या हस्ते ही मदत कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य जगदीश शेंडे, शुभम धुमनखेडे, संजय सोलकी, विशाल सिगनजुडे, चयतराम सपाटे, भगवान बिरमगडे, विजय ठवकर, संतोष निमकर, रामाराव सपाटे, देवचंद बिरमगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्व. सपाटे यांनी सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यांच्या व्यथेनंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, पंचनाम्याच्या प्रक्रियेत दुजाभाव झाल्याचा आरोप असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करणे आवश्यक आहे.
शेतकरी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत दिलेले आर्थिक मदतीचे आश्वासन पूर्ण करण्यात आले. संकटाच्या काळात कुटुंबाला दिलेला आधार आणि आश्वासनाची केलेली पूर्तता यामुळे आमदार नाना पटोले यांच्या या कृतीची परिसरात चर्चा होत आहे. स्व. राजेन्द्र सपाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सपाटे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.








