विधान परिषदेत अभिजित वंजारी यांनी केली पॅकेज वाढविण्याची मागणी
मुंबई/नागपूर १९: नागपूरमध्ये 23 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. आमदार अभिजित वंजारी यांनी नियम 93 अंतर्गत सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेले 204 कोटींचे पॅकेज अपुरे असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशादरम्यान विधान परिषदेत बोलताना आमदार वंजारी यांनी सांगितले की, 23 सप्टेंबरला नागपूर शहरात तब्बल 145 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामुळे अनेक घरात पाणी शिरले, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. नागनदीवरची सुरक्षा भिंत अनेक ठिकाणी कोसळली, परिणामी संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.
या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, शासनाने जाहीर केलेले 204 कोटींचे मदतीचे पॅकेज ही परिस्थिती पाहता अत्यंत अपुरे असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि पुनर्वसनाची कामे प्रभावीपणे करण्यासाठी जास्त निधीची गरज आहे, असे ते म्हणाले.
विधान परिषद अध्यक्षांनी वंजारी यांच्या मागणीची दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी विषय शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले.




