– औदुंबर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम;
– १३ सप्टेंबरला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पुरस्कार सोहळा
नागपूर :- शिक्षक दिनाचे औचित्य साधून औदुंबर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे नागपूर शहरासह विदर्भातील ३० उत्कृष्ट शिक्षकांचा ‘गुरुरत्न आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेच्या सचिव भाग्यश्री पवार यांनी सांगितले की, शिक्षक दिनानिमित्त पुरस्काराने गौरव होणे ही प्रत्येक शिक्षकासाठी अभिमानाची आणि स्वप्नपूर्तीची बाब असते. मात्र जिल्हा परिषद, महापालिका तसेच राज्य शासनाच्या विविध पुरस्कारांसाठी मोठी स्पर्धा असते. पुरस्कारांसाठी असलेले कठोर निकष आणि पुरस्कारांची मर्यादित संख्या यामुळे विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे अनेक शिक्षक या गौरवापासून वंचित राहतात. याच पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आलेल्या अनुभवातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्थेतर्फे गतवर्षीही ३० शिक्षकांना ‘गुरुरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यंदाही हा उपक्रम पुढे नेताना सुमारे महिनाभरापूर्वी विदर्भस्तरावर ऑनलाइन व सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागपूर शहर, ग्रामीण भाग तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल १५० शिक्षकांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केले. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर २९ ऑगस्ट रोजी संबंधित शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यातून ३० उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्यात आली. या ३० शिक्षकांसोबतच नागपूरमधील शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांचाही ‘गुरुरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एका सेवानिवृत्त शिक्षणतज्ज्ञाला ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या मात्र अंतिम ३० शिक्षकांमध्ये निवड न झालेल्या इतर १२० शिक्षकांनाही शिक्षक दिनानिमित्त संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमातून मोठ्या संख्येने शिक्षकांचा गौरव होणार आहे. पुरस्कार सोहळ्यास नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी निधीवन व वेदवेल यांचे सहकार्य लाभले आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भाग्यश्री पवार, प्राचार्य सुभाष खाकसे, डॉ. मंदा उमाठे, डॉ. प्रज्ञा देशपांडे, डॉ. वंदना बडवाई, डॉ. शारदा रोशनखेडे, कविता पवार, कॅप्टन विजय नाईक, मनोज कुंभारे, चंद्रप्रकाश चतुर्वेदी, डॉ. शुभ्र रॉय, डॉ. पितांबर उरकुडे, आरती भोसले, मेधा नावसाळकर, निखिलेश ढवळे, आर.जे.मोना आदींनी केले आहे.





