– बेहतर नागपूर अभियानाला ४० दिवस पूर्ण – रूबी पठाण
नागपूर :- भारतीय युवक काँग्रेसच्या राज्य सचिव रूबी अब्दुल्ला पठाण यांच्या नेतृत्वाखाली ‘मेरा शहर, मेरा हक़’ अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या Better Nagpur –बेहतर नागपूर अभियानाला ४० दिवस पूर्ण झाले. या कालावधीत शहरातील विविध प्रभागांत जनसंवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ४० टास्क पूर्ण करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अभियानाचा उद्देश केवळ समस्या प्रसिद्ध करणे नसून, त्या संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून समाधान होईपर्यंत पाठपुरावा करणे हा असल्याचे महाराष्ट्र समन्वयक राज्य सचिव रुबी अब्दुल्ला पठाण यांनी पत्रकारांना सांगितले. प्रभाग १७ मधील इंदिरानगर झोपडपट्टी व रमन सायन्स परिसरातील नजूल पट्ट्यांच्या रखडलेल्या अर्जांची प्रक्रिया पुढे नेण्यात आली. तसेच गटर व सीवर लाइनच्या समस्येसाठी निवेदन देण्यात आले असून, सुविधा उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. प्रभाग १८ मधील न्यू शुक्रवारी परिसरातील कचरा व अस्वच्छतेची समस्या पाठपुराव्यानंतर दूर करण्यात आली. प्रभाग ९ मध्ये नियमित कचरा संकलनाची मागणी, तर प्रभाग २ मध्ये गटर, पाणी, वीज, सीवर लाइन आणि पावसाळ्यात होणाऱ्या जलभरावाच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या भागात अनेक ठिकाणी आठ ते पंधरा दिवस पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे अभियानाच्या पाहणीतून समोर आले. अभियाना दरम्यान महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, दिव्यांग, छोटे दुकानदार,फळ-भाजी विक्रेते, ऑटो व ई- रिक्षा चालक, सफाई कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या नोंदविण्यात आल्या. “जिथे समस्या आहे, तिथे आम्ही जाऊ; नागरिकांचा आवाज उठवू आणि आश्वासन मिळालेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करू. गरज पडल्यास आंदोलनही करू,” अशी भूमिका रूबी अब्दुल्ला पठाण यांनी यावेळी मांडली. ४० दिवस पूर्ण झाले असले तरी अभियान थांबणार नसून, ‘समस्या ऐकली आहे, आता समाधानासाठी आवाज उठवू’ या भूमिकेतून पुढील काळातही नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. यावेळीपत्रपरिषद मध्ये रुबी अब्दुल्ला पठाण, रोशनी नितनवरे, विजया सावरकर, शमशुन शेख, रोजी शेख आणि वैशाली आवजे यांची उपस्थिती होती.





