spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोहाडीतील आदर्श सार्वजनिक वाचनालयाचा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात

– महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त इंजि. आनंद चंद्रिकारे यांचा ग्रामस्थांशी संवाद

पंकज परशुरामकर,गोरेगाव :- तालुक्यातील ग्राम मोहाडी येथे आदर्श सार्वजनिक वाचनालयाचा ४५ वा वर्धापन दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे गोरेगाव तालुका सचिव इंजि. आनंद चंद्रिकारे यांनी आवर्जून उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी इंजि.आनंद चंद्रिकारे यांनी सार्वजनिक वाचनालयाचे ग्रामीण भागातील महत्त्व अधोरेखित केले. वाचनालय हे केवळ पुस्तके वाचण्याचे ठिकाण नसून ज्ञान, विचार आणि संस्कारांची केंद्रे आहेत. गावातील विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांनी वाचनाची सवय जोपासून ज्ञानाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि ग्रामविकासाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांमधून समाजाने प्रेरणा घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे, असेही चंद्रिकारे यांनी सांगितले.

आदर्श सार्वजनिक वाचनालयाने गेल्या ४५ वर्षांच्या वाटचालीत गावातील वाचक, विद्यार्थी आणि युवकांना ज्ञानाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ग्रामीण भागात वाचनाची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशा वाचनालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान इंजि. आनंद चंद्रिकारे यांनी ग्रामस्थांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. गावातील नागरिक, युवक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला. आदर्श सार्वजनिक वाचनालयाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांनी वाचनालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Popular Articles