spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे ५६ नागरिक सुरक्षित

मुसळधार पावसात मनपाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र तैनात

आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह अधिकाऱ्यांची परिस्थितीवर नजर

मुख्यमंत्री  फडणवीस व पालकमंत्री  बावनकुळे यांनी जाणून घेतली माहिती

नागपूर,  १० : मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखोल भागात तसेच नाले व नदी काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मनपाची संपूर्ण  यंत्रणा सज्ज आहे. नागपुरात गेल्या दोन दिवसात २४० एमएम पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात नागरिकांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी अग्निशमन जवान व मनपाच्या विविध विभागाचे कर्मचारी अहोरात्र तैनात आहेत. नदी व नाले सफाईचे कार्य करण्यात आल्याने अनेक भागातून पाण्याचा निचरा होण्यास मदत मिळाली आहे. शहरातील परिस्थिती आटोक्यात आहे. अत्यंत आवश्यक असल्यास एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकाची मदत घेण्यात येईल, अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

पावसाळ्यात उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये अग्निशमन दलाचे जवान तसेच महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी अहोरात्र कामावर तैनात आहेत. पावसामुळे पाणी शिरलेल्या परिसरातून अग्निशमन जवानांनी शहरात आणि शहरालगतच्या परिसरात बचाव कार्य करीत ५६ च्या वर नागरिकांना सुखरूप बाहेर काढले असल्याचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

         

राज्याचे मुख्यमंत्री   देवेंद्र  फडणवीस यांनी नागपूर शहरातील अतिवृष्टीच्या स्थितीची मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. तसेच पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिक सजग राहण्याचे निर्देश दिले, व नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात प्रशासन सज्ज आहे.

अग्निशमन जवानांनी नरसाळा, नव कन्या नगर, भरतवाडा, धनगवळी(नवीन नगर) नगर, पवारी, भागातील पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम केले. तर काही ठिकाणी रेस्क्यू बोटीचाही वापर करण्यात आला. रस्त्यावर कोसळलेली झाडे कापून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी व उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली. या आपत्कालीन परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेत असलेल्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर अर्थात सीओसी केंद्रातून तात्काळ माहिती संबंधित झोन कार्यालय व अग्निशमन केंद्रांना दिली जात होती.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पुन्हा काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अधिक सतर्क व  सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश डॉ. चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत व अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. विविध ठिकाणी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त  मिलिंद मेश्राम, मुख्य अग्निशमन अधिकारी  तुषार बाराहाते, स्मार्ट सिटीच्या ई गव्हर्नस विभागाचे प्रमुख डॉ. शील घुले, माहिती तंत्रज्ञान अधिकारी  स्वप्नील लोखंडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 मनपाचे अधिकारी बचाव स्थळांवर

दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक भागात काही काळ पाणी जमा झाले होते. तसेच अनेक रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतुकीमध्ये बाधा निर्माण झाली. अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी विविध स्थळी भेट दिली. तर, आशीनगर परिसरासह विविध  सखल भागात पाणी साचल्याने उत्पन्न झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. या स्वतः आशीनगर झोनमध्ये दाखल झाल्या होत्या.यावेळी त्यांनी नागरिकांना तात्काळ मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

मां उमिया सोसायटीतील काही घरात पाणी शिरल्याने कळमना अग्निशमन केंद्रातील जवानांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तसेच घरातील पाण्याचा उपसा करण्यात आला. त्याचप्रमाणे दत्तात्रयनगरातील काही घरात पाणी शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यात आली.

रेस्क्यू बोटीचा वापर

नरसाळा भागात पाणी साचल्याने तसेच पाण्याचा पातळी अधिक असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने या भागातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्याचप्रमाणे काही लोकांचे वाहने सुद्धा बाहेर काढण्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत केली. नरेंद्रनगर परिसरात पाणी साचल्याने नरेंद्रनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी पंप लावून पाण्याचा उपसा केला. त्याचप्रमाणे मंगलदीप सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे त्रास होत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंपच्या सहाय्याने पाणी काढून लोकांची तक्रार दूर केली.

 अनेक जणांना सुखरूप वाचविले

 अग्निशमन जवानांनी नरसाळा, नव कन्या नगर, भरतवाडा, धनगवळी नगर, पवारी भागातील पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम केले. लकडगंज झोनचे सहाय्यक आयुक्त  विजय थूल आणि हनुमान नगर झोनचे सहाय्यक आयुक्त  नरेंद्र बावनकर यांनी त्यांच्या संबंधित झोनची माहिती दिली. यात अग्निशमन विभागातर्फे बोटच्या साहाय्याने मशान घाट जवळ एस.पी. वॉटरच्या बाजूला व प्रिंसेस लॉन नरसाळा आणि साई कॉलेज नरसाळा या परीसारातातील पुराच्या पाण्यामधून एकूण २८ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर अग्निशमन विभागातर्फे पाण्यात अडकलेल्या १५ लोकांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच पाण्याचा पुरामध्ये अडकलेल्या ७ लोकांना व झोन विभागातर्फे ७ अशा एकूण १४ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आली. यात २८ पुरुष, २६ महिला, दोन मुले व २ जनावरे असे एकूण ५८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

पाणी साचणे व झाडे कोसळण्याच्या तक्रारी

अग्निशमन दलाला एकूण ६८ ठिकाणी विविध सूचना मिळाल्या. तसेच ५ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. तर ५९ ठिकाणी पाणी कॉल  आले. तर एका घराची भिंत पडली काही झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला बाधा निर्माण झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडे कापून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. एलेक्स हॉस्पीटल, वनदेवीनगरातील नाल्याच्या काठावर असलेल्या काही घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागपूर महानरपालिका तसेच बीव्हीजीच्या टिमने तात्काळ दखल घेऊन सर्वांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्याचप्रमाणे नरसाळा स्मशानभूमीजवळ काही नागरिक पाण्याच्या विळख्यात अडकली होती. या सर्वांना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले व त्यांचा बचाव केला. अग्निशमन दलाचे प्रमुख  तुषार बारहाते  व स्वच्छता विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांनी घटनास्थळांवर जाऊन कामांचा आढावा घेत आहेत. डॉ. महल्ले यांनी पोहरा नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा आढावा घेतला. गांधीबाग झोन मध्ये शिकस्त इमारतीला पाडण्यात आले. सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता यांनी आपल्या झोन मध्ये पावसाशी परिस्थिती वर तत्त्काळ उपाय योजना नागरिकांना मदत केली.

अतिवृष्टीची माहिती व तक्रार करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने आपत्कालिन क्रमांक जारी केले आहे. या क्रमांकांवर अनेकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या तसेच त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या तक्रार निवारणासाठी नागरिकांना उपलब्ध असलेल्या १०१  या क्रमांकावर सुद्धा लोकांनी तक्रारी केल्या.

यांना सुखरूप काढले :

1) पुरुष – 28

2) महिला – 26

3) मुले – 02

4) प्राणी – 02

एकूण – 58


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.