– 18 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत ; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाळ :- अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026 अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 18 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली.
यवतमाळ जिल्ह्यात एकूण 6932 मतदारांची नोंद होती. त्यापैकी 6389 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 4560 पुरुष व 1829 महिला मतदारांनी मतदान केले. सकाळी 8 वाजता सुरु झालेले मतदान दुपारी 4 वाजेपर्यंत घेण्यात आले. काही ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्यामुळे उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात एकूण मतदानाची टक्केवारी 92.17 इतकी नोंदविण्यात आली.
पुरुषांपेक्षा महिलांची मतदानात आघाडी
मतदार यादीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात 6932 मतदारांपैकी 4963 पुरुष व 1969 स्त्री मतदार होते. या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत 4560 पुरुष मतदारांचे 91.88 टक्के मतदान झाले. तर 1829 महिला मतदारांनी 92.89 टक्के मतदान करुन मतदान प्रक्रियेत आघाडी घेतली.
संपूर्ण मतदान प्रक्रिया प्रत्येक तालुक्याच्या तहसिल कार्यालयातील 18 मतदान केंद्रांवर शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. शिक्षक मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदविल्याने निवडणूक प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभला.
27 ऑक्टोबरला अमरावती येथे मतमोजणी
या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 27 ऑक्टोबर 2026 रोजी अमरावती येथील लोकशाही भवन येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी काढले असून त्यानुसार निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.








