spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत  अंदाजे ९१.०८ टक्के मतदान

अमरावती /यवतमाळ :- विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील ८१ मतदान केंद्रांवर शांततेत व निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी जवळपास ९१.०८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.

आज सकाळी ८ वाजता सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदानास सुरूवात झाली. मतदानासाठी विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली होती. सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदानासाठी वेळ देण्यात आली होती. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकुण मतदारांची संख्या ३५ हजार ८१० असून त्यापैकी ३२ हजार ६१६ मतदारांनी मतदान केले आहे. जिल्हानिहाय एकुण मतदानाची माहिती अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. अमरावती – १०,०९७ पैकी ९०२३ (८९.३६ टक्के), अकोला – ५,९४२ पैकी ५४७४ (९२.१२ टक्के), बुलढाणा – ९,१२४ पैकी ८२८० (९०.७५ टक्के), वाशिम – ३,७१५ पैकी ३४५० (९२.८७ टक्के) आणि यवतमाळ – ६,९३२ पैकी ६३८९ (९२.१७ टक्के) मतदारांनी म्हणजे एकूण जवळपास ९१.०८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची प्राथमिक अंदाजे आकडेवारी पुढे आली आहे.

या निवडणुकीसाठी जिल्हानिहाय एकुण मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे होती. अमरावती – २५, अकोला – १३, बुलढाणा – १८, वाशिम – ७ आणि यवतमाळ – १८ अशी एकुण ८१ केंद्र स्थापन करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रावर मतदारांनी उत्साहपूर्ण व निर्भय वातावरणात मतदान केले. सर्व केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

निवडणूक निरीक्षक अभय महाजन आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त  नयना गुंडे यांनी आज सकाळी अमरावती शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत अपर आयुक्त संजय जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रावरील कामकाजाची माहिती घेऊन विभागीय आयुक्तांनी विभागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.

अमरावती विभागातील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेवर वेब कास्टींगच्या माध्यमातून विभागीय आयुक्त आणि निवडणूक निरीक्षक मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लक्ष ठेवून होते. याचप्रमाणे त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे सुद्धा जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून होते. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या स्टॉंगरूम येथे सुरक्षितरित्या जमा केल्या जातील अशी अपेक्षा आहे.

या निवडणुकीची मंगळवार २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवन येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

Popular Articles