spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अखेरच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार – भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे प्रतिपादन

नागपूर, ३० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. भारतीय घटना लिहून समस्त भारतवासीयांना एका सूत्रात बांधले. पीडितांना जगण्याचे बळ दिले. त्यांचे विचार आजही अनुकरणीय आहेत. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणार असल्याचा निश्चय भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी बोलून दाखविला.
दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी शुक्रवार, 29 ऑगस्ट रोजी आंबेडकरी अनुयायांना धम्मसंदेश दिला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कर्र्तृत्वाचा प्रभाव ससाईंवर पडला आणि त्यांनी स्वत:चे जीवन त्यांच्या विचारांवर चालण्यासाठी समर्पित केले. ससाई म्हणाले, बदलत्या भारतात डॉ. आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक आहेत. त्यांचे विचार खऱ्या अर्थाने आत्मसात करण्याची गरज आहे. कबहुना त्यांच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल आणि जीवन सुखमय करता येईल, असेही सुरेई ससाई म्हणाले.
स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेचा विचारच संपूर्ण जगाला शांततेचे जीवन देऊ शकतो. मानवी कल्याण धम्मात सामावलेले आहे. ‌‘बुद्ध आणि त्यांचा धम्म‌’ हा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला अखेरचा ग्रंथ आहे. समानता हेच तत्त्व या धम्मात आहे. ‌‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय‌’ हे या धम्माचे मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी ‌‘बुद्ध आणि त्यांचा धम्म‌’ या ग्रंथातून सविस्तरपणे मांडलेले आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेची भावना या ग्रंथातून अधोरेखित होते. सत्य, अहिंसा आणि शीलेचे पालन करण्यासाठी धम्म आहे. हा धम्म जीवन जगण्याची शैली सांगतो. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा ग्रंथ समग्र मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारा आहे, असेही ससाई म्हणाले.

Popular Articles