शालार्थ आयडी घोटाळा : ४५६ फायलींची तपासणी, फक्त ४ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी

0
48

नागपूर ३ : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील चौकशी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यातील या प्रकरणात गणेश विसर्जनानंतर बोगस शिक्षकांवर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

या घोटाळ्यात बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे तब्बल ६८० शिक्षकांची फसवी नियुक्ती करण्यात आली होती. यातील शिक्षकांना नियमित पगार मिळत होता आणि त्यामुळे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. सरकारने दिलेले हे पगाराचे पैसे परत वसूल करण्यासाठी भादंवि कलम १०७ अंतर्गत न्यायालयीन परवानगी घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

दरम्यान, दिवंगत शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या सहीने किती बनावट आदेश काढले गेले, याचा तपशील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे. मात्र संबंधित कागदपत्रे पुणे आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आली असल्याचे समजते. आतापर्यंत तपास यंत्रणेकडून दोन संगणक, वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांचा लॅपटॉप, मंघाम यांचा मोबाईल आणि वाय-फाय डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत. आरोपपत्र दाखल झाल्याने काही आरोपींनी जामिनासाठी अर्ज सादर केले आहेत.

तपासणीतील अडथळा : फायलींचा ढिगारा, कर्मचारी केवळ ४

या प्रकरणातील चौकशीत मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विलंब होत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील १०५५ पैकी २४ फायलींची तपासणी बाकी आहे. माध्यमिक शिक्षण विभागात १०३६ पैकी २८० फायली तपासायच्या होत्या, त्यापैकी ८० फायलींची तपासणी पूर्ण झाली असली तरी २०० फायली प्रलंबित आहेत. त्यातच आणखी २३२ फायली वाढल्याने एकूण ४३२ माध्यमिक व २४ प्राथमिक, अशा ४५६ फायली आता तपासायच्या आहेत.

ही सर्व कामे केवळ चार कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असल्यामुळे तपासणीचा वेग कमी झाला आहे. परिणामी, अहवाल सादर करण्यात होणारा विलंब कायम राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.