मौदा ३ : मौदा पोलिसांनी केवळ ५ तासांच्या आत बकरी चोरीचा गुन्हा उघड करत ५ आरोपींना जेरबंद केले. चोरीला गेलेल्या १४ बकऱ्यांसह स्कॉर्पिओ वाहन असा एकूण १४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबरच्या रात्री मौजा सुकळी गावातील विकेश पुडलिक मेश्राम यांच्या घरालगतच्या झोपडीतून अज्ञात चोरट्यांनी ९ बकऱ्या चोरी करून नेल्या. याप्रकरणी मौदा पोलिस ठाण्यात कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तक्रार दाखल होताच मौदा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गुन्हे शोध पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे मोहित रविंद्र डाफ (रा. गुमथळा), रोहित सुरेश धोटे (रा. गुमथळा), दिपक राजु चंदनखेडे (रा. आवंडी), राजरत्न राजेंद्र वासनीक (रा. कढोली) आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले.
विचारपूस केली असता आरोपींनी मौजा सुकळीतील ९ बकऱ्या चोरीची कबुली दिली. तसेच त्यांनी यापूर्वी कुही पोलीस ठाणे हद्दीतील साळवा गावातून ५ बकऱ्या चोरी केल्याचेही उघड केले.
आरोपींच्या ताब्यातून एकूण १४ बकऱ्या (किंमत २.३० लाख रुपये) व चोरीसाठी वापरलेले स्कॉर्पिओ वाहन (किंमत १२ लाख रुपये) असा एकूण १४.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.




