बेला ५ : बेला येथील लोकजीवन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक लक्ष्मण पुरुषोत्तम खोडके हे शाळा व गाव परिसरात सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवत असून विद्यार्थी व समाजात जनजागृती निर्माण करत असल्यामुळे ते ‘ उपक्रमशील शिक्षक ‘ म्हणून ख्याती प्राप्त झाले आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांच्यावर पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुलांना शिकवत असताना ते बालसंस्कार केंद्र चालवतात. पांडुरंग शास्त्री आठवले यांच्यापासून प्रेरणा घेऊन ते गावात स्वाध्याय परीवाराचे उद्बोधन वर्ग घेतात. श्रीराम नवमी व श्रीकृष्ण जन्माष्टमीला शालेय मुला-मुलींचा आकर्षक देखावा नागरिकांना दाखवतात.शाळेत त्यांनी सन 2000 मध्ये राष्ट्रीय हरित सेना निसर्ग मंडळाची स्थापना केली असून, त्या अंतर्गत ते पर्यावरण पूरक उत्सव जसे की वृक्षारोपण वृक्ष संवर्धन वृक्षदिंडी असे विविध उपक्रम साजरे करतात. रक्षाबंधनाला वृक्षांना मुलांकडून राखी बांधून घेतात. राख्या तयार करण्याचाही उपक्रम ते मुलांकडून राबवून घेतात. श्रावणात बेलाचे रोपटे लावा. गणेशोत्सवात पर्यावरण पूरक शाडू मातीचा गणपती खरेदी करा. असे आवाहन करतात. मानव व वन्यजीव संघर्ष होऊ नये. यासाठी ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वन्यजीव सप्ताह साजरा करतात.
जैवविविधता लेखन, रोपवाटिका, हस्ताक्षर सुधारणा कृती संशोधन प्रकल्प, सापांबद्दल गैरसमज दूर करणे, जल व्यवस्थापन शाडू माती पासून गणपती निर्माल्य संचालन, व्यवस्थापन, घनकचऱ्याचे व्यवस्थापन,प्लास्टिक विरोधी दिन वार्ताफलक फलक लेखन, सुविचार थोरांच्या जयंती पुण्यतिथी विषयी माहिती लेखन असे बरेच उपक्रम ते राबवतात. सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा ते अग्रेसर असतात. चित्रकला स्पर्धा, नृत्य,नाटिका,मूकनाट्य बसवले असून अंकुर वांग्मय मंडळाद्वारे त्यांनी अनेक लेख लिहिले आहे. स्काऊट गाईड चा कॅम्प सुद्धा ते घेतात. व मुलांना जिल्हा व तालुका मेळाव्याला घेऊन जातात. विविध उपक्रमामुळे त्यांना सन २००२-०३ चे सत्रात शाळेकडून उत्तम शिक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यांनी राबविलेला बीज संकलन उपक्रम सन २००८ ला जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने गौरविण्यात आला.
त्यांना विदर्भ पर्यावरण शिक्षण परिषद कार्यशाळाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्यामुळे सन २०१४ ला सामाजिक वनीकरण विभागातर्फे पर्यावरणीय उत्कृष्ट कार्याबद्दल शाळेला पंचतारांकित शाळा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. प्रदूषण मुक्त महाराष्ट्र अंतर्गत त्यांनी २००५ मध्ये उत्कृष्ट प्रतिकृती सादर केल्यामुळे त्यांची तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली होती. याशिवाय त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक या उपाधीस पात्र आहे. शिक्षक दिनानिमित्त त्यांचे अभिनंदन.




