नागपूर १० : मंत्रालयाशी संबंधित बनावट नोकरी घोटाळा उघडकीस आणत नागपूर पोलिसांनी एकाला अटक केली असून सहा आरोपी अद्याप फरार आहेत. हुडकेश्वर पोलिसांनी तक्रारीवरून ही कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सात जणांच्या टोळीने नोकरीच्या शोधात असलेल्या एका युवकाला कनिष्ठ लिपिक पद मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ५५ हजार रुपये लाटले. एवढेच नव्हे तर या टोळीने मंत्रालयाच्या आवारात बनावट मुलाखतही घेतली. त्यामुळे पीडित युवकाला नोकरी खरी असल्याचा विश्वास बसला आणि त्याने रक्कम अदा केली.
अटक केलेल्या आरोपीचे नाव लॉरेन्स हेन्री (४५, रा. महालगी नगर, नागपूर) असे आहे. तर फरार आरोपींमध्ये शिल्पा उडापुर (४०), वसंतकुमार उर्फ वसंतराव उडापुर (६०), विजय पाटणकर (४०), नितीन साठे (४१), सचिन डोलस (४५) आणि मंत्रालयातील एक peon यांचा समावेश आहे.
या प्रकरणामुळे मंत्रालयातील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक राबविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.




