नागपूर, ता. ११ : नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग आणि क्रीडा व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा मुख्यालय स्थित दिव्यांग कक्ष येथे दिव्यांग कलाकारांची वाद्य वृंद निवड चाचणी बुधवारी (ता.१०) घेण्यात आली.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनपा समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नूतन मोरे, क्रीडा विभागाच्या क्रीडा निरीक्षक उज्ज्वला चरडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. मनपाद्वारे दिव्यांग कलाकारांची वाद्य वृंद निवड चाचणी करण्यात येत आहे. निवड झालेल्या कलावंताना प्रशिक्षण दिले जाणार आहे, प्रशिक्षणपूर्ण करून हे चमू विविध स्थरावर मनपाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी सांगितले. तर उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी चाचणीसाठी आलेल्या सर्व कलावंताना शुभेच्छा दिल्या.
दिव्यांग कलाकारांची वाद्य वृंद निवड चाचणीसाठी २७ दिव्यांग कलावंतानी सक्रीय सहभाग नोंदविला. सदर चाचणीचे पर्यवेक्षण पर्यवेक्षक विवेक लोहकर, हर्षदा हेडाऊ, आनंद ढोबळे यांनी केले.




