पाचखेडी, ११ : देशाचा कणा असलेला बळीराजा दरवर्षी अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करत असताना, शेतकऱ्यांच्या चालू खात्यातील पैसे त्यांच्या नकळत कर्ज खात्यात वळते केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज, दि. ९/९/२०२५ रोजी इंडियन बँकेच्या पाचखेडी (गाव) शाखेत घडली असून, यामुळे शेतकरी चिरकुट ऐळबा मारबते यांना मोठा धक्का बसला आहे.
शेतकरी चिरकुट मारबते यांच्याकडे अडीच एकर शेती असून, त्या शेतीच्या उत्पन्नावरच ते मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी २०२३ मध्ये पन्नास हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते, जे थकले होते. शासनाने अलीकडेच धानाच्या बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते. मारबते यांना निंदण, खुरपणी व खत खरेदीसाठी या पैशांची अत्यंत गरज होती. मात्र, ते पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता, बँक व्यवस्थापकाने त्यांच्या नकळत स्वाक्षरी घेऊन चालू खात्यातील रक्कम कर्ज खात्यात वळते केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेमुळे संतापलेल्या मारबते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “जर बँक व्यवस्थापक शेतकऱ्याच्या चालू खात्यातून पैसे थेट कर्ज खात्यात जमा करत असतील, तर उर्वरित कर्ज कोण भरणार? मग शेतकरी स्वतःसाठी पैसे कुठून आणणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे “शेतकरी वाचेल तर देश वाचेल” ही घोषणा फक्त भाषणांपुरती मर्यादित आहे का, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि ते सक्षम व्हावेत यासाठी धान बोनस देते, हे खरे असले तरी, शेतकऱ्यांच्या चालू खात्यात जमा झालेल्या पैशांचा उपयोग कसा करायचा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त शेतकऱ्यालाच आहे. एखाद्याच्या खात्यातून परस्पर पैसे काढणे किंवा वळते करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
या संदर्भात पीडित शेतकरी चिरकुट मारबते यांनी पोलिस ठाण्यात जाऊन बँक व्यवस्थापकाविरुद्ध तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
पीडित शेतकरी चिरकुट मारबते
“शेतकऱ्यांना मिळणारे बोनसचे पैसे हे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी आणि ते सक्षम व्हावेत यासाठीच शासन देत असते. शेतीत उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त होतो, त्यामुळे बोनस ही मोठी मदत ठरते. महाराष्ट्र शासन मागील तीन वर्षांपासून धान पिकाला प्रती हेक्टर २० हजार रुपये बोनस देत आहे. परंतु हे पैसे बँक मॅनेजर शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय थेट कर्ज खात्यात जमा करत आहेत. हे शेतकऱ्यांवरील अन्याय असून, आमच्यासारख्या लहान शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.”




