नागपूर १२ : गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. १८ वर्षीय तरुणाने मध्यरात्री घरात घुसून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तलवारीच्या धाकावर अपहरण केले. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपीला अटक करण्यात आली असून मुलीची सुटका करण्यात यश आले आहे.
आरोपीचे नाव अमित मनोज सोनटक्के असे असून त्याची ओळख पीडित मुलीसोबत आधीपासून होती. काही काळापूर्वी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मुलीने प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याच रागातून अमितने हे कृत्य केले.
१० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे २ वाजता आरोपी तलवार घेऊन मुलीच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजा ठोठावला असता मुलीची ६४ वर्षीय आजीने दरवाजा उघडला. त्यावेळी आरोपीने आजीला तलवार दाखवून धमकावले व घरात जबरदस्ती घुसला. त्यानंतर झोपेत असलेल्या मुलीला उठवून तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला.
मुलीने विरोध दर्शविला असता आरोपीने तिचा गळा दाबला व तलवार गळ्याला लावून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिला घेऊन गेला. पीडितेच्या आजीच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात अपहरण, घरफोडी, धमकी, विनयभंग तसेच पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अमित सोनटक्केला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.




