लातूर १२ : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भरत महादेव कराड (३५) या रिक्षाचालकाने मांजरा नदीत उडी घेऊन जीवन संपवले. ओबीसी आरक्षण धोक्यात येत असल्याच्या भीतीतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
भरत कराड गेल्या काही वर्षांपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सक्रिय होते. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. “हैदराबाद गॅझेट” लागू झाल्यास ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी त्यांची भीती होती.
आत्महत्येपूर्वी भरत यांनी “ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे” आणि “सरकार ओबीसीविरोधी आहे” अशा घोषणा दिल्या. काही युवकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. त्यांच्या चिठ्ठीत “सरकारने ओबीसी समाजाचा घात केला आहे. माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा,” असे लिहिलेले आहे.
भरत यांच्या मृत्यूमुळे गावात व परिसरात संताप उसळला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. “ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे” आणि “भरत कराडांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही” अशा घोषणांनी वातावरण संतप्त झाले.
भरत यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्याकडे केवळ १० ते २० गुंठे जमीन असल्याचे समजते. या घटनेमुळे ओबीसी समाजात सरकारविरोधात तीव्र असंतोष आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.




