Home Latest News नागपूरात दोन स्कूल बसची धडक; ८ विद्यार्थी जखमी, संतप्त जमावाचा रस्ता रोखून...

नागपूरात दोन स्कूल बसची धडक; ८ विद्यार्थी जखमी, संतप्त जमावाचा रस्ता रोखून निषेध

0
65

 

नागपूर १२ – नागपूर शहरात शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सकाळी कोराडी रोडवरील मॅक्स हॉस्पिटलजवळ दोन स्कूल बसच्या समोरासमोर धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात भवन्स आणि नारायण स्कूलचे तब्बल ८ विद्यार्थी जखमी झाले, त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला.

घटनेनंतर संतप्त जमावाने त्वरित रस्त्यावर आंदोलन सुरू केले. नागरिकांनी रस्त्याच्या कामातील बेफिकिरीबद्दल संताप व्यक्त करत काम करणाऱ्या खासगी कंपनीविरोधात ‘ओरिएन्ट कंपनी मुर्दाबाद’च्या घोषणाबाजीसह रस्त्यावर बसून निषेध केला. भीती आणि संतापामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कोराडी रोडवरील अपुऱ्या आणि हलगर्जी कामामुळे हा अपघात झाला. या कामात दिरंगाई आणि वाहतुकीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे या भागात अपघात वारंवार होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून येथे सतत अपघात होत असून प्रशासन या बाबतीत कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि जमाव पांगवण्यासाठी बंदोबस्त वाढवला.

अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही पालकांना मुलांना पाहून आक्रोश फुटला. नागरिक आता जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत आणि प्रशासनाची निष्क्रियता निषेधाचा मुद्दा बनली आहे.

वारंवार होणाऱ्या अपघातांची जबाबदारी
कोराडी रोडवर राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामातील बेपर्वाईमुळे अपघात वारंवार होत आहेत. अनेक जखमी होतात, काहींचा जीवही जातो, तरीही एनएचआय आणि स्थानिक प्रशासन फक्त तमाशा बघत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आजच्या भीषण अपघाताने प्रशासन आणि कंत्राटदार कंपन्यांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

सर्वांचे लक्ष आता प्रशासन आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेकडे लागले आहे, आणि नागरिक जबाबदारांवर कठोर कारवाई न झाल्यास शांत बसणार नाहीत, असे ते स्पष्ट करत आहेत.