तृतीयपंथी महिलेला मारहाण करून दोन तोळ्याची पोत लंपास;आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

0
77

सुरज बंडीवार: पांढरकवडा :- भिक्षा मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तृतीयपंथी महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळे सोन्याची पोत जबरदस्तींने हिसकावून नेल्याची घटना केळापूर तालुक्यातील करंजी येथे घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी फरार आहेत. दि.१३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता फिर्यादी व तिच्या दोन सहकारी सोबत करंजी येथे भिक्षा मागण्यासाठी गेल्या असता, तिथे मुस्कान उर्फ संदीप चव्हाण (वय ३६, रा. तिवसा) आणि बबली उर्फ उद्धल आडे (वय ३५, रा. बोरगाव) हे देखील भीक मागत असल्याचे दिसले, या कारणावरून शाब्दिक वाद निर्माण झाला. पुढील दिवशी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वरील दोघे फिर्यादीच्या घरासमोर आले. तिला अभ्लील शिवीगाळ करत हात उचलण्यात आला. बबली हिने गळा पकडुन ढकलले, तर मुस्कान हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर त्यांनी “पुन्हा आमच्या वाटेला आलीस तर जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली. दरम्यान, घर उघडे असल्याचा फायदा घेत दोघांनी मिळून फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याची अंदाजे,६० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत हिसकावली व तिथून फरार झाले. पांढरकवडा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.