हंसराज,भंडारा :- अवघ्या ५ ते १० हजार रुपयांच्या आमिषाला बळी पडून आपले बँक खाते अनोळखी व्यक्तींना वापरण्यास देणे किंवा विकणे अत्यंत महागात पडू शकते. भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमधील नागरिकांनी अशाच प्रकारे आपली बँक खाती दिल्याचे समोर आले असून, चालू आठवड्यातच अशा नागरिकांवर तेलंगणा, मुंबई, बुलढाणा आणि गोंदिया पोलिसांनी संबंधित सायबर गुन्ह्यांच्या तपासात अटक कारवाई केली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर भंडारा पोलीस प्रशासनाने जिल्हावासीयांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
सध्या सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना विविध आर्थिक आमिषे दाखवून मोबाईलवर लिंक पाठवणे व त्याद्वारे बँक खात्यातील पैसे परस्पर दुसऱ्या खात्यांत वळते करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा फसवणुकीतून मिळवलेली रक्कम तातडीने काढून घेण्यासाठी सायबर चोरटे आता सामान्य नागरिकांच्या बँक खात्यांचा वापर करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. घरबसल्या पैसे कमावण्याचे किंवा कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही व्यक्तींकडून अवघ्या ५ ते १० हजार रुपयांच्या मोबदल्यात त्यांचे बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक आणि इतर आवश्यक तपशील ताब्यात घेतले जातात. सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी व पुढे वळती करण्यासाठी अशा खात्यांचा वापर केला जातो, ज्याला सायबर गुन्हेगारीच्या भाषेत ‘म्यूल अकाउंट’ (Mule Account) असे म्हटले जाते.
सायबर गुन्हेगार विविध राज्यांतून नागरिकांची आर्थिक फसवणूक करून ती रक्कम दुसऱ्यांच्या नावावरील बँक खात्यांमध्ये जमा करतात. यातून मूळ गुन्हेगार पडद्यामागे राहून आपली ओळख लपवतात; परंतु ज्या व्यक्तीच्या खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होते, त्या खातेदाराचा तपास यंत्रणांकडून शोध घेतला जातो. संबंधित व्यक्तीने पैशांच्या आमिषाने आपले खाते दुसऱ्याला दिले असल्यास तिलाही पोलीस तपास आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. केवळ काही हजार रुपयांसाठी स्वतःचे बँक खाते विकून इतर राज्यातील पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणे व स्वतःचे भविष्य धोक्यात घालणे टाळावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आपले बँक खाते ही आपली आर्थिक ओळख असून त्याचा वापर कोणत्या कारणासाठी होत आहे,याची जबाबदारी प्रत्येक खातेदाराने समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैशांच्या मोबदल्यात बँक खाते वापरण्यास देऊ नये किंवा विकू नये, तसेच आपले एटीएम कार्ड, पासबुक, चेकबुक, ओटीपी, यूपीआय पिन व इंटरनेट बँकिंगची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन भंडारा पोलीस प्रशासनाने केले आहे. खात्यात अनोळखी व्यक्तीकडून पैसे जमा झाल्यास ते स्वतः काढून देऊ नयेत किंवा अन्य खात्यात वळते करू नयेत. अशी संशयास्पद ऑफर मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. तसेच सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांकडून कळवण्यात आले आहे.






