जपानमध्ये शिक्षण संशोधनाच्या अनेक संधी – तोकुसीमा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. पंकज कोईनकर यांचे प्रतिपादन

0
61

– रसायनशास्त्र विभागात नॅनोपार्टीकल तयार करण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धतीवर व्याख्यान

नागपूर :- मानवी मूल्यांसह निसर्ग रक्षणास सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या जपान येथे शिक्षण आणि संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन तोकुसीमा विद्यापीठातील ऑप्टिकल सायन्स विभागातील प्राध्यापक तसेच सेंटर फॉर इंटरनॅशनल रिसर्च अँड एज्युकेशनल कॉर्पोरेशनचे उपसंचालक डॉ. पंकज कोईनकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागात द्रवपदार्थात लेझर ॲब्लेशनचा वापर करीत नॅनो पार्टिकल तयार करण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धतीवर बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी व्याख्यान पार पडले. यावेळी डॉ. कोईनकर मार्गदर्शन करीत होते.

प्रभारी प्र कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांनी कार्यक्रमाची अध्यक्षता केली कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून जापानच्या तोकुसीमा विद्यापीठातील ऑप्टिकल सायन्स विभागातील प्राध्यापक तसेच सेंटर फॉर इंटरनॅशनल रिसर्च अँड एज्युकेशनल कॉर्पोरेशनचे उपसंचालक डॉ. पंकज कोईनकर, आय आय एल प्रभारी संचालक डॉ. रवीन जुगादे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय ढोबळे यांची उपस्थिती होती. जापान या देशामध्ये ४०० विद्यापीठे असल्याचे सांगत यातील नामांकित असलेल्या काही विद्यापीठांमध्ये इंग्रजी मधून शिक्षण घेता येत असल्याचे डॉ. कोईनकर यांनी पुढे बोलताना सांगितले. जपान येथील विद्यापीठांमध्ये सत्रामध्ये प्रवेश घेता येत असून प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोजित केली जाते. याकरिता नोंदणी करणे आवश्यक असून संशोधन करावयाचे असल्यास तेथील शिक्षकांची पूर्व अनुमती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जपान येथील प्रमुख १० विद्यापीठांची माहिती देत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करावी, विद्यापीठाची माहिती कशी घ्यावी, शिक्षकांशी संपर्क कसा साधावा, त्याचप्रमाणे तेथील विद्यापीठाकडून दिल्या जात असलेल्या विविध शिष्यवृत्तीची माहिती कशी घ्यावी, याबाबत विस्तृत माहिती डॉ. कोईनकर यांनी दिली. या सोबतच लेझर ॲब्लेशनचा वापर करीत नॅनोपार्टिकल तयार करण्याबाबत केलेल्या संशोधनाबाबत त्यांनी माहिती दिली. लाल, हिरवा, पांढरा आदी रंगाच्या एलईडी बाबत माहिती देत असताना निळ्या रंगाच्या एलईडीची जपानमध्ये प्रथमच निर्मिती करण्यात आल्याने तेथील संशोधकाने प्राप्त केलेल्या नोबल पुरस्कार प्राप्त केल्याने त्याचे महत्त्व यावेळी सांगितले. प्लॅटिनम नॅनो पार्टिकलचा वापर औषध निर्मितीत होत आहे. या सोबतच सेमीकंडक्टर निर्माण करताना नॅनो पार्टिकलच्या उपयोगाबाबत माहिती त्यांनी दिली. जळगाव विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर संशोधन करीत असताना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कोरीया संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर जपान येथील मानवी मूल्यांची जपवणूक त्याचप्रमाणे निसर्ग रक्षणाची असलेली संस्कृतीचे आकर्षण असल्याने तेथे कार्य करण्याची संधी मिळाली अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे जीवनात यशस्वी होण्याचे सप्तसुत्र देखील त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषण करताना प्र कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांनी जपान येथे शिक्षण तसेच संशोधनाच्या माध्यमातून विविध संधी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात अशी माहिती दिली. या प्रकारचे व्याख्यान यापूर्वी भौतिकशास्त्र विभागात आयोजित करण्यात आले होते. रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना देखील जपानमध्ये संशोधनाकरिता जाता यावे याकरिता या व्याख्यानासाठी आलेले डॉ. कोईनकर यांचे त्यांनी आभार मानले. भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय ढोबळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी विभागातील डॉ. राजेंद्र डोंगरे, डॉ. विजय तांगडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राधिका राजाभोज यांनी केले तर आभार डॉ. विजय तांगडे यांनी मानले कार्यक्रमाला रसायनशास्त्र विभाग आणि भौतिकशास्त्र विभागातील संशोधक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.